वसई : आरोपी अनिल दुबे न्यायालयाच्या आवारातून फरार झाल्याप्रकरणी शशिकांत धुरे या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँक दरोडय़ातील आरोपी अनिल दुबे हा शुक्रवारी पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. त्याला सोमवारी अटक करण्यात आली आहे.
विरारमध्ये जुलै २०२१ रोजी आयसीआयसीआय बँकेवर दुबे याने दरोडा घालून महिला व्यवस्थापकाची हत्या केली होती. शुक्रवारी त्याला वसई न्यायालयात आणले जात असताना पोलिसांना चकमा देऊन तो पसार झाला होता. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने दोन दिवसांत त्याचा शोध घेऊन दुबे आणि त्याचा साथादीर चांद खान याला अटक केली आहे. त्याला ठाणे कारागृहातून वसई न्यायालयात नेण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी शशिकांत धुरे (५२) याने हलगर्जी दाखवल्यामुळेच दुबे फरार झाल्याचा ठपका ठेवून त्याला निलंबित करण्यात आले आहे.
साथीदाराची ऐनवेळी माघार
कारागृहात दुबेची ओळख चांद बादशहा खान (४२) नावाच्या आरोपीबरोबर झाली होती. तेथे पलायनाची योजना बनवली होती. चांद जामिनावर बाहेर आल्यानंतर प्रत्यक्ष योजना अमलात आली. चांदने दुचाकीला बनावट नंबर प्लेट लावली आणि शुक्रवारी न्यायालयाबाहेर येऊन थांबला. दुबे पोलिसांना लघुशंकेचा बहाणा करून सटकला आणि चांदच्या दुचाकीवर बसून फरार झाला. तो पंजाब किंवा नेपाळला पळून जाणार होता. गुन्हे शाखा-३ च्या पथकाने सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक माहिती काढून चांदची ओळख पटवली आणि त्याच्या नातेवाईकांना चौकशीसाठी आणले. चांदला पकडले जाण्याची भीती वाटली आणि त्याने दुबेला मध्येच सोडून दिले. दोन रात्र त्याने पदपथावर काढली. त्याच्याकडे पैसे नव्हते. सोमवारी वसईच्या गावराई पाडय़ात नातवाईकाकडे आश्रयासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली.