वसई: वसईत अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरात प्रदूषण व वाहतूक कोंडीची समस्या जटिल झाली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी सणासुदीच्या काळात अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून वाहतूक सुरूच ठेवल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट गाड्या अडवून धरल्या होत्या.वसई विरार शहरात सुरू असलेल्या विकास कामामुळे माती, रेती, काँक्रिट या मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचे प्रमाण वाढले आहे.यामुळे त्या वाहनांच्या चाकाला व वाहनातून वाहतूक करताना काही वेळा माती रस्त्यावर पडते.यामुळे प्रदूषण निर्माण होऊ लागले आहे. तर दुसरीकडे शहरांतर्गत रस्ते अरुंद असल्याने अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे.
विशेषतः सणासुदीच्या काळात नागरिक हे खरेदी व फिरण्यासाठी बाहेर पडत असल्याने रस्त्यावर मोठी गर्दी असते. अवजड वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पाच ते सहा दिवस वसई पारनाका, सागरशेत रस्ता , पापडी रस्ता माती व काँक्रीट वाहतूक करण्यासाठी बंद करावी अशी मागणी भाजपाचे वसई शहर मंडळ अध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी वाहतूक विभागाकडे केली होती.
त्यानंतर सुद्धा मातीची वाहतूक सुरू होती. या वाढत्या प्रदूषणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ही अवजड वाहने अडवून धरली होती.पोलिसांनी अडवून धरलेली वाहने ताब्यात घेऊन त्यावर कारवाई केली जाईल व दिवाळी संपेपर्यंत वाहतूक बंद राहील असे आश्वासन दिले असल्याचे महाजन यांनी सांगितले आहे.