महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे जून महिन्यात दोन जणांचा विजेच्या धक्काने मृत्यू झाला आहे. वारंवार अशा घटना घडूनही महावितरण त्यातून कोणताच बोध घेतलेला नाही. महावितरणाच्या वीजवाहक तारा, संच, भूमीगत केबल आजही धोकादायक अवस्थेत आहेत. दुसरीकडे सलग वीज पुरवठा होत नाही आणि वर अवाजवी वीज देयकांमुळे वीज ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. महावितरणाचा हा कारभार सुधारणार कधी असा सवाल केला जात आहे.
२०२२ मध्ये विरार मध्ये तनिष्का कांबळे या शालेय विद्यार्थिनीचा भूमीगत वीजवाहक तारांमुळे वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. या घटनेनंतर मोठा जनआक्रोश झाला होता. तेव्हा अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची ग्वाही महावितरणाने उच्च न्यायालयात दिली होती. मात्र हे दावे किती पोकळ होते ते दिसून आले आहे. २७ जून रोजी वसई पारनाका येथील भास्कर आळी परिसरात नऊ वर्षीय झियाउद्दीन शेख या वीज पेटी संचाच्या धक्क्याने मृत्यू झाला.वीज विषयक अनेक समस्या अजूनही शहरात कायम असल्याचे चित्र आहे. उघडी रोहित्र, लोंबकळत्या वीजतारा, उघडे वीज पेट्या (डीपी बॉक्स )याकडेही तितक्याच तत्परतेने लक्ष द्यायला हवे तसे होत नसल्याने अनेक ठिकाणच्या भागात रोहित्र ही कचऱ्याच्या विळख्यात अडकून आहेत. तर काहींना संरक्षक जाळ्या ही लावण्यात आल्या नाहीत. तर काही ठिकाणी डीपी बॉक्स उघडे तर तुटलेल्या स्थितीत पडून असतात अशा वेळी नागरिक तक्रार करतात तेव्हा इतक्या तत्परतेने त्याठिकाणी लक्ष दिले जात नाही. याचाच परिणाम अपघाताच्या घटनांमधून समोर येत असतो.
सातत्याने अशा घटना समोर येत असताना महावितरण त्याला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहेत खरे तर अशा घटनांमधून महावितरणने यापुढे अशा घटना घटना घडणार नाहीत यासाठी विशेष उपाययोजना आखणे गरजेचे आहे. दुर्घटना घडल्यानंतर खडबडून जागे होऊन केवळ काही दिवस मोहीम राबवून नागरिकांच्या मनाचे समाधान करायचे मात्र त्यानंतर जैसे थे परिस्थिती यातून साध्य काय होणार हा खरा प्रश्न आहे. शहरात वीज वितरणाचे अंथरलेले जाळे सुरक्षित आहे किंवा नाही याची जबाबदारी महावितरण अधिकारी कर्मचारी यांनी घ्यायला हवी. तरच विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या घटना टाळता येतील. पण दुर्दैवाने तशी घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात अशा अप्रिय घटना घडण्याचा धोका कायम आहे.
सुरळीत वीज पुरवठा कधी ?
वसई विरार शहराचे नागरीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वीजेची मागणी ही अधिकच वाढत आहे. वसई विरार शहरासह वाडा या विभागात वसईच्या मंडळामार्फत वीज पुरवठा केला जात आहे. घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी, नागरीसेवा, पथदिवे असे सुमारे दहा लाखाहून अधिक वीज ग्राहक आहेत. मात्र वीजग्राहकांना अखंड वीजपुरवठा मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत असते. सद्यस्थितीत सर्वच दैनंदिन कामे ऑनलाइन स्वरूपात झाल्याने आताच्या काळात वीज अधिकच महत्वाची बनली आहे. वीज नसेल तर अनेक कामे खोळंबून पडतात याचा प्रत्यय अनेकदा सर्वसामान्य वीज ग्राहकांसह औद्योगिक क्षेत्राला येत असतो. महावितरणने बदलत्या काळाच्या ओघात वीज वितरण प्रणाली सुधारायला हवी होती. मात्र वीज वितरण प्रणालीमध्ये सुधारणा न केल्याने आजही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. वीज ग्राहकांना चांगली वीजसेवा मिळावी ही महावितरणाची प्राथमिकता असायला हवी होती. मात्र त्या उलट चित्र वसईच्या भागात आहे. सद्यस्थितीत महावितरण वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवून महावितरण यंत्रणा ही स्मार्ट असल्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. परंतु वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणारी आपली विद्युत प्रणाली तितकीच स्मार्ट आहे का ? याचा ही विचार करायला हवा. आताचे वसई विरारचे चित्र पाहता वीज यंत्रणेवर अतिभार देऊन वीज पुरवठा करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. सर्वसामान्य वीज ग्राहकांसह औद्योगिक क्षेत्राला याचा मोठा फटका बसू लागला आहे. दैनंदिन कामकाजासह उद्योग ही ठप्प होत आहेत. रात्री अपरात्री वीज जात असल्याने ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण, लहान मुलं यांचे प्रचंड हाल होतात.
हेही वाचा…बहुजन विकास आघाडीचे नेते प्रशांत राऊत यांना मारहाण
औद्योगिक क्षेत्र डबघाईला
वसईचे अर्थचक्र चालविणाऱ्या औद्योगिक क्षेत्र ही विजेअभावी डबघाईला येऊ लागले आहेत. वसईच्या भागात १५ हजाराहून अधिक छोटे मोठे उद्योग कारखाने उभे आहेत. यात सुमारे पाच लाखाहून अधिक कामगारांना रोजगार मिळाला असून औद्योगिक वसई अशी शहराची ओळख निर्माण झाली आहे. मात्र महावितरण कडून योग्य ते वीज वितरण नियोजन नसल्याने याचा फटका या उद्योगांना बसू लागला आहे. वसईला दैनंदिन लागणाऱ्या विजेच्या मागणीत निम्म्याहून अधिक वीज औद्योगिक क्षेत्राला लागते. परंतु तीच सुरळीत नसल्याने येथील उद्योग गुजरात राज्य व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. जर येथील उद्योग अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले तर याचा मोठा परिणाम रोजगार यासह येथील स्थानिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.