लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. महामार्गावरील बापाणे पूलाच्या खाली असेलल्या एका खड्डयात पडून दुचाकीच्या झालेल्या अपघातात २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मालाड येथे राहणारी ही महिला वसईत बहिणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होती. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पूजा गुप्ता (२७) ही विवाहित महिला पतीसोबत मालाड पश्चिमेच्या आकाशवाणी येथील वृंदावर अपार्मटमेंट मध्ये राहत होती. बुधवार ९ ऑगस्ट वसईत राहणार्या पूजाच्या मामेबहिणाचा वाढदिवस होता. त्यासाठी पूजा तिचा दिर दिपक गुप्ता (२४) याच्या दुचाकावरून वसईच्या वालीव येथे जाण्यासाठी निघाली होती. दिपकच्या पल्सर मोटारसायकलीवर (एमएमत ४७ बीसी ५३९०) पूजा मागे बसली होती. रात्री ९ च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे पूलावरून दुचाकी खाली उतरत असताना मध्येच असलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. यावेळी मागे बसलेली पूजा खाली पडली आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी गोखिवरे येथील प्लॅटीनम या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील १० दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री उपचारादम्यान पूजाचा मृत्यू झाला.
आणखी वाचा-वसईतील अनधिकृत इमारती प्रकरणी तिसरा गुन्हा दाखल
दुचाकी खड्ड्यात पडल्याने पूजा गुप्ता खाली फेकली गेली आणि या अपघातात तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सध्या आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी दिली.