लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : वीज देयक थकबाकी ठेवणाऱ्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली. आतापर्यंत महावितरणने साडे पाच हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. अजूनही १४ कोटींची वीज देयके थकीत असल्याने त्याची वसुली करण्यासाठी पथके ही सक्रिय करण्यात आली आहेत.
वसई विरार विभागात महावितरण तर्फे वीज ग्राहकांना विद्युत पुरवठा केला जात आहे. सध्या स्थितीत औद्योगिक, घरगुती, व्यावसायिक, सार्वजनिक, व इतर असे दहा लाखापेक्षा अधिक वीज ग्राहक आहेत. मात्र काही वीज ग्राहक वीज देयक भरण्यास पुढे येत नसल्याने महावितरणची थकबाकी ही कोट्यावधी रुपयांच्या घरात जात आहे. या थकबाकीमुळे महावितरणला मोठा आर्थिक फटका बसू लागला आहे. वसई मंडळात महावितरणचे मार्च महिन्याचे ३४५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून त्यापैकी आतापर्यंत ३३० कोटी रुपये इतकी वीज देयकांची रक्कम वसूल झाली आहे. मात्र अजूनही १४ ते १५ कोटी रुपयांची रक्कम अजूनही थकीत आहे.
वीज ग्राहकांनी वीज देयक भरा असे सांगूनही वेळेत विज देयक भरणा केल्या नसल्याने ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महावितरण तर्फे पथके तयार करून वीज पुरवठा खंडित केला जात आहे.जे मागील दोन ते तीन महिन्यांपासून वीज देयक भरत नाही व ज्यांची थकबाकी रक्कम अधिक आहेत अशा वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे.आतापर्यंत ५ हजार ५०० इतक्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे. वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी वीज देयक भरल्यास तातडीने त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत केला जात आहे असेही खंडारे यांनी सांगितले आहे.
वसुलीसाठी अवघे तीन दिवस
थकीत वीज देयक वसुलीसाठी अवघे चार दिवस उरले असल्याने अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, वायरमन, जन मित्र यासह महावितरणच्या विविध विभागातील कर्मचारी यांची पथके तयार करून वसुलीचे काम केले जात आहे. तर जे वीज देयक भरत नाही त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे.
वीज देयक भरण्याचे आवाहन
थकीत रक्कम वसूल करण्यासाठी आता सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली असून याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजदेयक भरण्यात यावे असे आवाहन महावितरण ने केले आहे.