भाईंदर :-देशात तरुणांमधील घटस्फोटांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. ही एक चिंतेची बाब असून त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होऊ लागला आहे. त्यामुळे  तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी देशातील प्रमुख शहरात विवाहपूर्व समुपदेशन (‘प्री मॅरेज  काऊंसिलिंग) केंद्र उभारण्याचा निर्णय  राष्टीय महिला आयोगाने घेतला आहे. या केंद्राचे लोकार्पण येत्या ८ मार्च रोजी म्हणजे महिला दिनी केले जाणार आहे.

सामाजिक दायित्व निधीच्या मदतीने महिलांचे सशक्तिकरण करण्यासाठी उत्तनच्या राम भाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये  राष्ट्रीय महिला आयोग व म्हाळगी प्रबोधनी संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातील प्रमुख खासगी संस्थेच्या प्रतिनिधीनी तसेच सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता.यावेळी सामाजिक दायित्व निधीच्या मदतीने महिलांना सशक्त करण्याच्या हेतूने शिक्षण, संधी आणि आर्थिक सहकार्य देण्यासारख्या प्रमुख बाबींवर मंथन करण्यात आले. यात दायित्व निधीचा वापर कशाप्रकारे होऊ शकतो याबाबतचे मार्गदर्शन आयोगाकडून देण्यात आले.

हेही वाचा >>>वेतनाची मागणी केली म्हणून डोंबिवलीत पलावा येथे दोन भावांना विकासकाची मारहाण

या प्रसंगी बोलत असताना देशात तरुणांमध्ये वाढते घटस्फोटाचे प्रमाण  ही एक चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.पूर्वीच्या काळी एकत्रित कौटुंबिक व्यवस्थेत राहत असल्याने तरुण मुला- मुलींना सुखी संसार करण्याचे मार्गदर्शन मिळत होते.मात्र  प्रगतीच्या मार्गावर  धावत असलेले तरुण आता स्वतंत्र राहण्यास प्राधन्य देत आहेत.परिणामी या तरुण मंडळींना लग्ननंतर बदलणाऱ्या परिस्थितीला हाताळणे व त्यातून मार्ग काढणे  कठीण होत आहे. यावर अभ्यास केले असता ही केवळ कौटुंबिक स्तरावरची समस्या नसून त्याचा व्यापक परिणाम इतर गोष्टीवर देखील होऊ लागला आहे.त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी आयोगातर्फे देशातल्या प्रमुख शहरात ‘प्री मॅरेज  काऊंसिलिंग केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यातील काही केंद्राचे येत्या ८ मार्च रोजी  लोकार्पण करणार असल्याची माहिती रहाटकर यांनी दिली.

लग्न व्यवस्थेबाबत तरुणांना जागरूक करण्यासाठी त्यांना वेळेत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. यात देशात नोकरी उपलब्ध करून देणाऱ्या संस्था प्रमुख भूमिका बाजावू शकतात.त्यामुळे अशा संस्थांनी सामाजिक दायित्व निधीचा वापर करून कार्यालय ठिकाणी ”प्री मॅरेज  काऊंसिलिंग’ केंद्र उभारण्यास सुरुवात करावी. यात राष्टीय महिला आयोग सहयोग करणार असल्याचे अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आवाहन केले आहे.

Story img Loader