वसई: वसई विरार शहरात नालेसफाईला शुक्रवारपासून सुरवात करण्यात आली आहे. यांत्रिक पद्धत वापरून ही सफाई पावसाळ्या आधीच पूर्ण केली जाणार आहे.यासाठी २४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरतील नाल्यांची साफसफाई करण्याचत येत असते. शहरात १ लाख ५० हजार ५९० मीटर लांबीचे २०१ नाले आहेत. बेकायदा बांधकामे, माती भराव, विकासाच्या नावाखाली बुजविण्यात आलेले नैसर्गिक नाले कचरा, गाळ, माती ढिगारे यामुळे नाले तुंबून गेले आहेत. याशिवाय नाले तुंबून गेल्याने पाणी जाण्यास ही अडचणी येत आहेत तर दुसरीकडे डासांचा प्रादुर्भाव याशिवाय दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून वसई विरारकरांना पूरस्थितीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहेत.

तासभर जरी पाऊस झाला तरीही सखल भागात पाणी जमत असते. त्यामुळे पालिकेने यंदा एप्रिल महिन्यातच नालेसफाईच्या कामाला सुरवात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवार पासून ९ प्रभागात एकाच वेळी नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. २०२४ मध्ये देखील पालिकेने एप्रिल महिन्याच्या मध्यात नालेसफाईला सुरवात केली होती.

यंदा पालिकेने नालेखोदाई व पूरप्रतिबंधक कामे यासाठी २४ कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद केली आहे. पावसाळा सुरू होण्या आधीच शहरातील सर्व नाल्यातील गाळ उपसा करून स्वच्छ केले करण्यात येणार आहेत. जेणेकरून पावसाच्या पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यास मदत होईल असे पालिकेने उपायुक्त नानासाहेब कामठे (घनकचरा) यांनी सांगितले.

नालेसफाई करताना ज्या ठिकाणी पोकलेन यंत्र किंवा जेसीबी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी पाण्यातून किंवा दलदलीच्या भागातून गाळ काढण्यासाठी पालिकेने ड्रेन मास्टर या आधुनिक यंत्राचा वापर सुरू केला आहे. काही नाले हे वनविभागाच्या अखत्यारीत येतात. त्यासाठी वनविभागाची परवानगी लागणार असल्याने पालिकेने वनविभागाची पत्रव्यवहार केला आहे. दैनंदिन नालेसाफाईच्या कामावर प्रत्येक प्रभागनिहाय उपअभियंता, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांमार्फेत पर्यवेक्षण केले जाणार आहे. प्रत्येक अधिकार्‍यांना देखरेखीसाठी नाले विभागून देण्यात आले आहे. या नियोजनामुळे नालेसफाई योग्यरित्या केली जाईल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला.

शहरात सुरू असलेल्या नालेसफाईचे काम योग्य पघ्दतीने आणि परिणाकारकरित्या व्हावे यासाठी त्यावर अधिकार्‍यांमार्पत पर्यवेक्षण केले जाणार आहे. शहरातील ९ प्रभागातील नाल्यांवर सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त दर आठवड्याला पर्यवेक्षण करणार आहे. नाल्यातील काढलेला गाळ टाकण्यासाठी जागा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. वसई विरार शहरात १८० किलोमीटर लांबीचे दिडशेहून अधिक नाले आहेत. सर्वाधिक नाले जी- वालीव (५१) आणि एफ- पेल्हार (४३) प्रभागात आहेत.