भाईंदर : येत्या महिन्याभरात पावसाची हजेरी लागणार असल्याने मीरा-भाईंदर महानगरपालिकेने मान्सूनपूर्व तयारीला सुरुवात केली आहे. नाले आणि धोकादायक इमारतींवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागाच्या देखभालीसाठी ‘प्रभाग पालक अधिकाऱ्यांची’ नेमणूक करण्यात आली आहे.
मुसळधार पाऊस पडताच मीरा-भाईंदर शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. यंदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी मान्सूनपूर्व उपाययोजनेवर भर देण्यास सुरुवात केली आहे. याकरिता त्यांनी शहरातील २४ प्रभागांवर लक्ष ठेवण्याकरिता विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे अधिकारी दररोज प्रत्येक प्रभागातील रस्त्यावरील खड्डय़ाची, पाणी साचलेल्या नाल्यांची आणि धोकादायक ठरत असलेल्या इमारती आणि भिंतींची पाहणी करणार आहेत. कामात हलगर्जी होऊ नये, यासाठी या अधिकाऱ्यांनाच प्रत्येक प्रभागाचे पालकत्व सोपवण्यात आले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या कामात समाविष्ट करण्यात आले आहे.
मीरा-भाईंदर शहरातील नाल्यांची योग्य प्रकारे सफाई झाली आणि रोज नाल्यात जाणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण आले तर पूरपरिस्थितीचा धोका उद्भवणार नाही. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना आतापासूनच खबरदारीची पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. – दिलीप ढोले, आयुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा