वसई : विरारमधील विवा विधि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बतुल हमीद यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सध्याच्या राजकीय वातावरणामुळे अस्वस्थ वाटत असून महाविद्यालयाच्या विश्वस्तांकडून छळ होत असल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकातील हिजाब प्रकारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. महाविद्यालय व्यवस्थापनाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 महाविद्यालयात २०१९ पासून डॉ. बतुल हमीद या प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. अचानक त्यांनी ई-मेलद्वारे महाविद्यालय व्यवस्थापनाला राजीनामा पाठवला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे.  त्यामुळे महाविद्यालय विश्वस्तांकडून माझा छळ केला जात आहे. अशा वातावरणात मला काम करणे शक्य होणार नाही असे कारण देत त्यांनी हा राजीनामा दिला आहे.

या संदर्भात करण्यात आलेले आरोप  निराधार असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयाचे विश्वस्त आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली. आमची संस्था मागील पस्तीस वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेमध्ये अनेक मुस्लीम पदाधिकारी कार्यरत आहे. आजवर कोणाला त्रास झाला नाही. हिजाब प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट  केले.

या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी विवा महाविद्यालयात चौकशी केली. प्राचार्या डॉ. बतुल हमीद यांनी आमच्याकडे कुठलीही तक्रार केलेली नाही. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यात हिजाब प्रकरणाचा कुठलाही उल्लेख केला नसल्याचे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले.

 महाविद्यालयातील सर्व विश्वस्तांनी छळ केल्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र नेमका कुणी आणि काय छळ केला हे त्या सांगू शकल्या नाहीत. आम्ही त्यांचा सविस्तर जबाब नोंदविणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Principal of law college resigns in virar akp
Show comments