लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : भाईंदरमध्ये रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या खासगी बस गाड्यांवर शुल्क आकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्या नंतर चालकांनी मैदानाऐवजी रस्त्याचा पर्याय शोधला आहे. या गाड्या रस्त्यात उभ्या केल्या जाऊ लागल्याने नवीन समस्या निर्माण झाली आहे.

मिरा भाईंदर शहरात मोठ्या संख्येने खासगी बस गाड्या उभ्या केल्या जातात. प्रामुख्याने या गाड्या पूर्वी भाईंदर पश्चिम येथील सुभाष चंद्र भोस मैदानाला लागून असलेल्या मोकळ्या रस्तेत उभ्या केल्या जात होत्या. त्यामुळे वर्षभरापूर्वीच अशा बस गाडयांवर शुल्क आकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.यासाठी एक निश्चित रक्कम ठरवून प्रशासकीय ठराव देखील करण्यात आला.तर हे शुल्क वसुल करण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आले होते. त्यानुसार सुरुवातीच्या काही दिवस यास बस चालकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला होता.

मात्र आता यातील बहुतांश बस चालक शहरातील अन्य मोकळ्या रस्त्यावर मोफत बस गाड्या उभ्या करत आहेत. परिणामी तेथील रस्ते हे अरुंद होत असून कोणतीही दुर्घटना घडण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे अशा बस चालकांवर कारवाई करून शुल्क वसुल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर शहरात बेकायदेशीर पणे उभ्या राहत असलेल्या बस गाड्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाला पत्र दिले जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

शुल्कवाढीचा निर्णय का?

मीरा भाईंदर शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या सोबत वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी असल्याने कोणत्याही ठिकाणी वाहने उभी केली जात होती.

भाईंदर शहरात रस्त्याच्याकडेला खासगी बस गाड्या उभ्या करण्यात येतात.अरुंद रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या या गाड्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे बस चालक शहरातील अंतर्गत रस्त्यावर तसेच एकांत जागेत या बस गाड्या उभ्या करत होते. त्या ठिकाणी युवक सिगरेट व मद्य सेवन केले जात होते. चार वर्षांपूर्वीच भाईंदर पश्विम येथील जय अंबे नगर परिसरात एका बस चालकाने चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे खासगी बस गाड्याच्या वाहनतळाला नियंत्रणात आणण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

त्यावरून भाईंदर पश्चिम येथील सुभाष चंद्र भोस मैदानातजवळ उभ्या राहणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि हायमस दिवा लावण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त संजय काटकर यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिले. याठिकाणी उभ्या राहणाऱ्या वाहनांकडून देखील वाहनतळ शुल्क वसुल करण्याचे धोरण तयार करण्याचे आदेश वाहन विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार सदर जागेचा आढावा घेतल्यानंतर २६ बस गाड्या उभ्या राहणाऱ्याची क्षमता असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रति वाहन मासिक ४०० रुपये आणि १८ टक्के जीएसटी शुल्क निश्चित करून सदर जागेत दोन पाळीत ४ कर्मचारी तैनात करण्याचा प्रशासकीय ठराव नुकताच मंजुर करण्यात आला होता.