वसई- भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी ट्रॅव्हल्स वाहनाने एका दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी संध्याकाळी ४ वाजता विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथे हा अपघात घडला.

सचिन तांबे (४०) आणि राजश्री तांबे (३६) हे दांपत्य विरार पूर्वेत्या मनवेल पाडा मधील चेतन अपार्टमेंट मध्ये राहतात. त्यांना २ मुली आहेत. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास पती पत्नी शाळेतून मुलींना आणण्यासाठी आपल्या दुचाकीवरून निघाले होते. सचिन दुचाकी चालवत होता तर त्याची पत्नी राजश्री या मागे बसली होती. त्यावेळी मनवेल पाडा येथील डिमार्ट समोरून भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी ट्रॅव्हल्स वाहनाने (एमएच ०४ केएफ ५१५३) जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील राजश्री तांबे हिचा जागीच मृत्यू झाला तर सचिन तांबे हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरार पोलिसांनी आरोपी वाहन विजय साळवी (३३) याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५(ब) तसेच मोटार वाहतूक कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मद्याच्या नशेत भरधाव वाहन चालवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्याने मद्य प्राशन केले आहे की नाही ते स्पष्ट होईल, असे पोलिासंनी सांगितले.

Story img Loader