निरी व आयआयटीच्या सूचनेनुसार नियोजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्पेश भोईर

वसई: वसई-विरार शहरातील पूरस्थितीची समस्या दूर करून उपाययोजना करण्यासाठी पालिकेकेने निरी’ व ‘आयआयटी’ यांनी दिलेल्या सूचनेनुसार कामांचे नियोजन केले आहे. त्यासाठी २९५ कोटींच्या विविध कामांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. वसईत दरवर्षी पावसाळय़ात पूरस्थिती निर्माण होऊ असते. नैसर्गिक नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमणे , बेकायदा माती भराव व नियोजन शून्य पद्धतीने बांधण्यात आलेली बांधकामे यामुळे शहरात मागील चार ते पाच वर्षांपासून शहरातील विविध ठिकाणच्या भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसणे, वाहतूक ठप्प होणे, जनजीवन विस्कळीत होणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. याचा मोठा फटका हा वसईच्या जनतेला बसत आहे. ही पूरस्थितीची समस्या सुटावी व यापुढेही पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या सत्यशोधन समित्यांची नेमणूक केली होती.  अहवालानुसार शहरातील पाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी व पावसाचे पडणारे पाणी शहरात साठून राहू नये व पाणी जाण्यासाठी जागा मिळावी यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.

याच अनुषंगाने पालिकेने पावले उचलली आहे. यात धारण तलाव (होिल्डग पॉण्ड्स ) विकसित करणे, रस्त्यांची उंची वाढविणे व आवश्यकते नुसार कलव्हर्ट व पूल तयार करणे, नाल्यांचे रुंदीकरण , स्वयंचलित कालवा गेट, स्वयंचलित हवामान आणि पर्जन्यमान मापन यंत्रणा  पाणलोटासाठी खुले नाले तयार करणे आदी कामांचा समावेश आहे. या सर्व कामांचे नियोजन करून त्याचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या सर्व कामासाठी जवळपास २९५ कोटीं रुपये इतक्या निधीची आवश्यकता आहे. मात्र सध्या स्थितीत इतका मोठा उभारणे पालिकेला शक्य नसल्याने पालिकेने या कामांचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. शहरातील पूरस्थिती नियंत्रण होण्यासाठी पालिकेकडूनही विविध स्तरावर उपाय योजनाही आखण्यात येत असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

धारण तलाव तयार करण्यास प्राधान्य

  • एकीकडे पालिकेने शहरातील पूरस्थितीवर उपाययोजना म्हणून निरी व आयआयटी यांनी दिलेल्या सूचनेनुसार कामांचा प्रस्ताव तयार करून शासनाला दिला आहे. तर दुसरीकडे पालिकेने पालिका स्तरावर उपाययोजना आखण्यास सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात पालिकेने धारण तलाव तयार करण्यास प्राधान्य दिले आहे.
  • या धारण तलाव तयार करण्यासाठी जागाही निश्चित केल्या आहेत. नालासोपारा येथील निळेमोरे येथील ६५ एकर जागा ताब्यात घेतली आहे. परंतु तलाव तयार करण्यास याआधी त्या ठिकाणी खोदकाम करावे लागणार आहे. यामुळे मोठा खर्च येणार आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने आता ज्यांना ही माती हवी असेल त्यांनी ही माती स्वखर्चाने उचलून न्यावी यासाठी पालिकेने निविदा ही काढली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली आहे.  ज्यांना या कामात स्वारस्य आहे त्यांनी पुढे यावे असे आवाहनही पालिकेने केले आहे.

शहरातील पूरस्थिती समस्या सुटावी या अनुषंगाने पालिकेचे प्रयत्न सुरूच आहेत. निरी व आयआयटी यांनी दिलेल्या सूचनेनुसार पूरस्थिती नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या कामांचे नियोजन करून २९५ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग महापालिका