वसई- विरारच्या म्हाडा येथे नुकताच सेक्स रॅकेट उघडकीस आल्यानंतर शहरातील वाढत्या वेश्याव्यवसायाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. वसई विरार तसेच मीरा रोड आणि भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय सुरू आहे. परराज्यातील तरुणींना फसवून या व्यवसायात आणले जात आहे. अशा प्रकरणी मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने २०२३ या वर्षात ५२ गुन्हे दाखल करून १०४ तरुणींची सुटका केली आहे.
शहराच्या लोकसंख्येबरोबरच अनेक गुन्हेगारी कारवाया वाढत आहेत. परराज्यातील अल्पवयीन मुली तसेत तरुणींना फसवणून आणून देहव्यापार करवून घेतला जात आहे. वसई, नालासोपारा, विरार, आदी शहरांच्या विविध भागांत हा छुपा व्यवसाय राजरोस सुरू आहे. अशा वेश्याव्यवसायांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेकडून कारवाया सुरू असतात. नालासोपारा येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या पथकाने २०२३ या वर्षात पिटा (अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायदा) अंतर्गत एकूण २१ गुन्हे दाखल करून ४० तरुणींची सुटका केली. त्यात २ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या प्रकरणात एकूण २९ जणांना अटक करण्यात आली होती. त्यात १३ महिला आणि १६ पुरुषांचा समावेश आहे. त्यात दलाल तसेच बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घेणार्या आरोपींचा समावेश आहे.
हेही वाचा – वसई : कुख्यात टोळीचा पोलिसांवर हल्ला, ६ पोलीस जखमी
मीरा रोड, भाईंदरमध्ये ३१ गुन्हे
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या भाईंदर कक्षानेही २०२३ या वर्षात पिटा कायद्याअंतर्गत ३१ कारवाय केल्या आणि ६४ तरुणींची सुटका केली. त्यामध्ये ४ अल्पवयीन मुलींचा समावेश होता. या प्रकरणात ५४ दलालांना अटक करण्यात आली. त्यात २२ महिलांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांनी दिली.
हेही वाचा – रिकाम्या शहाळ्यांपासून आकर्षक भेटवस्तू, वसई विरार महापालिकेची अनोखी संकल्पना
म्हाडा वसाहतीमधून सेक्स रॅकेट
विरार पश्चिमेला बोळींज येथे म्हाडाची वसाहत आहे. यातील डी-७ इमारतीच्या सदनिका क्रमांक २१०४ मध्ये आंतरराष्ट्रीय देह व्यापार सुरू होता. अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने छापा घालून या फ्लॅटमधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका केली. अन्य दोन मुलींना नालासोपारा येथील प्रगतीनगरमधून अटक करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट टोळीचा सुत्रधार आरोपी अशोक दास असून तो बांग्लादेशी आहे. आपल्या साथीदारांच्या मदतीने तो बांग्लादेशातून बेकायदेशीरपणे अल्पवयीन मुली आणि तरुणींना फसववून देहव्यापारासाठी मुंबईत आणत होता. बांग्लादेशातून मुली आणल्यानंतर या फ्लॅटमध्ये ठेवायचा. त्यानंतर या मुलींना मुंबईच्या ग्रॅंट रोड येथील रेड लाईट एरियामध्ये देहव्यापारासाठी पाठवत होता. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. मागील दोन वर्षांत त्याने ३०० हून अधिक बांग्लादेशी मुलींना फसवून मुंबईत देहव्यापारासाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले होेते.