लोकसत्ता वार्ताहर
भाईंदर : मिरारोड येथील एका गृह संकुलातील बांधण्यात आलेले शौचालयावर महापालिका प्रशासनाने अतिक्रमण विरोधी कारवाई केल्याने वाद उभा राहिला आहे. या इमारतीत असलेल्या अनधिकृत हॉटेलविरोधात तक्रारी करून कारवाई केलेली नाही. मात्र याच हॉटेलचालकाच्या तक्रारीवरून इमारतीमधील शौचालय जमीनदोस्त करण्यात आल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
मिरा भाईंदर शहराच्या मुख्य मार्गावर गौरव गार्डन नामक मोठे गृहसंकुल आहे. दोन वर्षांपूर्वी या जागेत अतिक्रमण करून ‘हॉलिडे’ नामक हे हॉटेल उभारण्यात आले. त्यामुळे दुकानदारांची गैरसोय होऊ लागली. यावर उपाय म्हणून काही दिवसापूर्वी सोसायटीतर्फे सोसायटी आवारात नव्या शौचालयाचे काम हाती घेण्यात आले. मात्र या शौचालयाला हॉटेल चालकाचा विरोध असल्याने त्याने ‘फुल हाऊस हॉस्पीलिटी ‘ या नावाने याबाबत ची तक्रार महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यावरून सोमवारी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ च्या अतिक्रमण विभागाने हे शौचालयाचे बांधकाम जमीनदोस्त केले.
प्रशासनाच्या कारवाईमुळे सोसायटी मधील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरला. मागील दोन वर्षांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून हॉटेल उभारले असल्याची तक्रार सातत्याने केल्यानंतर ही महापालिका प्रशासन त्यावर दाद देत नाही आणि त्याच अनधिकृत बांधकाम करणाऱ्या हॉटेल चालकाच्या तक्रारीवरून शौचालय पाडण्याची कारवाई करत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
हॉटेल चालकाला परिवहन मंत्र्याचे संरक्षण?
मिरा भाईंदरच्या मुख्य मार्गावरील गौरव गार्डन इमारतीच्या बाहेर हॉलिडे नामक हॉटेल उभारण्यात आले आहे.यात हॉटेल व्यवसायिकाने मूळ जागेपासून पुढे येत पत्र्याचे शेड उभारून बांधकाम केले आहे.मात्र ही जागा (नवीन सर्वेक्षण- ८१)शासकीय असल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे सोसायटी मधील नागरिकांना यावर मागील दोन वर्षांपासून आक्षेप घेतला आहे ज्या ठिकाणी बेकायदा बांधकाम झाले आहे, त्यालगतची मालमत्ता ही ‘विहंग हॉस्पिटॅलिटी’ची आहे. यामध्ये परिषा आणि प्रताप सरनाईक हे ‘विहंग हॉस्पिटॅलिटी’च्या संचालकपदावर आहेत. यापूर्वीच हॉटेलचे बाहेरील बांधकाम बेकायदेशीर असल्याचा अहवाल तलाठीकडून तहसीलदारांना देण्यात आला आहे. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या भीती मुळे प्रशासन कारवाई करत नसून उलट हॉटेल चालकाला सहकार्य करत असल्याचा आरोप सोसायटी मधील रहिवासी करत आहेत.
“सदर गृहसंकुलात शौचालय उभारले जात असल्याची तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.तर हॉटेलच्या बेकायदा बांधकामाबाबत सविस्तर माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.” -सुधाकर लेंढवे- सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी ( प्रभाग क्रमांक ४)