विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विनाश सुरू असल्याचा आरोप

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात अडथळा निर्माण करणारे वृक्ष तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र या वृक्षतोडीला वसईतील पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विनाश सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा प्रकल्प वसई-विरारच्या भागातून जात आहे. या प्रकल्पात गोखिवरे, बिलालपाडा, मोरे गाव, ससूनवघर या गावांतील एक हजार ३६८ झाडे यात बाधित होत आहेत. यामध्ये अगस्त, ऐन, आंबा, आपटा, बाबूल, बेल, अमाती, बेहडा, भेंड, चिंच, चारकोल, बदाम, बोर, कडुनिंब, जांभूळ, आवळा, काजू, काकड, खैर, निलगिरी, पिंपळ, खजूर, कांचन, काळा उंबर, सुपारी, ताड, नारळ, सोनमोहर अशा विविध प्रजातींच्या वृक्षाचा समावेश आहे.  वृक्षप्राधिकरण विभागाने जाहिरात प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यानुसार पर्यावरणप्रेमींनी हरकत दाखल केली आहे. सध्या पर्यावरणाचा  ऱ्हास सुरू आहे, असे असताना त्याचे संवर्धन  गरजेचे आहे, असे पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी म्हटले आहे.

पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवाल चुकीचा 

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवाल तयार केला होता. मात्र तयार केलेला अहवाल बोगस असल्याचा आरोप समीर वर्तक यांनी केला आहे. हा फसवणूक करणारा अहवाल आम्ही जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीला चार वर्षांपूर्वी कळविला होता. त्यानंतर त्यांचे प्रतिनिधी आम्हास भेटण्यासाठी आलेले होते. आम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे आणि त्यांनी केलेल्या चौकशीमुळे आजपर्यंत या प्रकल्पासाठी देण्यात येणारे कर्ज मिळालेलेच नाही. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणार की नाही हीच शंका असताना वृक्षतोड करणे हेच अनधिकृत, असे वर्तक यांनी सांगितले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against felling of trees bullet train project allegation destruction environment development ysh