लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांगांना रुपये ६ हजार मानधन अशा विविध मागण्यांसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजन नाईक व स्नेहा दुबे-पंडित यांच्या घरासमोर मशाल आंदोलन केले. शनिवारी रात्री बाराच्या सुमारास निवास स्थानाच्या बाहेर उभे राहून शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी बांधवांची अवस्था बिकट आहे. याशिवाय दुसरीकडे कर्जाचा डोंगर ही वाढत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होऊन बसले आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्वच आमदारांच्या घरासमोर मशाल आंदोलन हाती घेतले आहे. वसई विरार मध्येही प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री एकत्र जमत वसईच्या आमदार स्नेहा दुबे- पंडित व नालासोपारा आमदार राजन नाईक यांच्या निवास स्थानाच्या समोर आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या सरकारचे डोळे उघडण्यासाठी हे मशाल आंदोलन हाती घेण्यात आल्याचे यावेळी हितेश जाधव यांनी सांगितले. देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या घोषणेची त्यांनी आठवण करून दिली. त्याच्या जय जवान, जय किसान या घोषणेसोबत जय संविधान असा नारा देऊन हितेश जाधव यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव आणि दिव्यांगांना प्रती महा रुपये ६ हजार इतके मानधन जो पर्यंत दिले जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता.
यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आजूबाजूचा परीसर दणाणून सोडला होता.या आंदोलनात पक्षाचे महिला आणि पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
आमदारांची लढ्याला साथ
प्रहारच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. अखेरीस आमदार राजन नाईक व आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी आपल्या घराबाहेर येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व त्यांनी दिलेली निवेदने स्वीकारली. शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या लढ्याला वसई व नालासोपारा या दोन्ही विधानसभा क्षेत्रातील आमदारांनी साथ देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासन नंतर आंदोलन कर्त्यांनी माघार घेतली