लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई: विरार शहरातील पाणी जाण्याच्या नैसर्गिक नाला १ किलोमीटर पर्यंत बुजवून टाकल्याने शहर जलमय झाल्याचा आरोप आगरी सेनेने केला आहे. येथील तिवरांची कत्तल कशी होत गेली आणि नाल्याची स्थिती दाखवणारा गुगल नकाशा आगरी सेनेने शुक्रवारी पालिकेसमोर सादर केला. विकासकावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी आगरी सेनेने पालिका मुख्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
विरार शहरात यंदाच्या पावसात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दोन दिवस झाले तरी पाण्याचा निचरा झालेला नाही. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. लोकांना ट्रॅंक्टर मधून ये-जा करावी लागत आहे. शहरातील पाणी बोळींज जवळील खारोडी येथे असलेल्या नाल्यातून जात आहे. मात्र या नाल्यावर मेट्रीक्स शाळेच्या मागे विकासकाने भराव केला आहे. त्यामुळे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याचा आरोप आगरी सेनेने केला आहे. हा नाला त्वरीत मोकळा करावा अशी मागणी आगरी सेनेने केली असून त्यासाठी शुक्रवारी सकाळी पालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. पुर्वी नाल्याची स्थिती आणि आताची स्थिती दाखवणारा गुगल नकाशा आगरी सेनेचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी पालिका अधिकार्यांसमोर सादर केला.
हेही वाचा… Monsoon Update : पाऊस थांबला तरी साचलेले पाणी ओसरेना; वसई, विरारमध्ये नागरिकांचे हाल
२०१३ ते २०२१ च्या गुगल नकाशांमध्ये कशा प्रकारे तिवरांची झाडांची कत्तल झाले ते दिसत असल्याचे पाटील यांनी सांगितले. येथील १३ मीटर रस्त्ता गायब करून नाल्यात भराव केला आहे असा आरोप पाटील यांनी केला. नाल्यात एक किलोमीटर पर्यंत भराव केला असल्याचा आरोप त्यांनी केला. हा भराव कुणाच्या हितासाठी केला त्याची चौकशी करून त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
हेही वाचा… वसईत शनिवारी रेड ॲलर्ट; अनावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका
ज्या ठिकाणी माती भराव आहे तो मोकळा करण्यासाठी आम्ही जेसीबी घेऊन गेलो होतो मात्र प्रचंड पाऊस आणि सर्वत्र पाणी असल्याने हे काम करता आले नव्हते असे पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले. येथील नाले मोकळे करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले.