वसई: तुंगारेश्वर पर्यटन स्थळ व महादेव मंदिर या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन नवीन पुलांची उभारणी केली जाणार आहे. यासाठी सुमारे एक कोटी ६५ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे पाठविण्यात आला आहे.
वसई तालुक्याच्या पूर्वेकडील भागात तुंगारेश्वर पर्वत आहे. पर्वतावर तुंगारेश्वर देवस्थान आहे. निसर्गरम्य पर्वतांच्या कुशीत असलेल्या श्रीतुंगारेश्वर महादेव मंदिराला महाराष्ट्र शासनाने सन २००० साली ‘क’ वर्गीय पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी दररोज मोठय़ा संख्येने भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. पर्यटकही या भागाला भेट देतात. मात्र अजूनही या भागात विविध प्रकारच्या सोयीसुविधांचा अभाव आहे.
पावसाळय़ात पर्वतावरून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत असते. मुख्य मार्गातच पाणी साचून राहत असल्याने येथून ये-जा करण्यास नागरिकांना अडचण होते. साचलेल्या व वाहत्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. यासाठी या भागात पुलाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी श्रीतुंगारेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ यांच्यामार्फत वन विभागाकडे करण्यात येत होती. अखेर या ठिकाणच्या भागात नाले टाकण्यात आलेल्या ठिकाणी दोन नवीन पूल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सार्वजनिक बांधकाम व वन विभाग यांच्यामार्फत पाहणी करून आराखडा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी ३० फूट लांबीचे दोन पूल तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी एक कोटी ६५ लाख रुपये निधीचे अंदाजपत्रक तयार करून ते पालघर नियोजन समितीकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे, अशी माहिती वसई सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. मंजुरी मिळताच या दोन्ही पुलांची कामे मार्गी लावली जातील असेही बांधकाम विभागाने सांगितले आहे.
प्रवाशांची धोकादायक प्रवासातून सुटका
तुंगारेश्वर पर्वतावर जाणाऱ्या मार्गावर पाणी साचत असल्याने नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत होता. पावसाळा सरला तरीही जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी पाणी साचून राहते. त्यामुळे उन्हाळय़ातही नागरिकांना या पाण्यातून प्रवास करावा लागतो. आता पूल तयार होणार असल्याने नागरिकांची धोकादायक प्रवासातून सुटका होणार आहे.
तुंगारेश्वर पर्वत येथे जाणाऱ्या मार्गात दोन ठिकाणी नाले आहेत. त्या ठिकाणी पूल तयार करण्यात येणार आहेत. वन विभागाच्या सहकार्याने आम्ही प्रस्ताव डिसेंबरमध्ये पालघर नियोजन यांच्याकडे मंजुरीला दिला आहे.
— प्रशांत ठाकरे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वसई