वसई- पश्चिम रेल्वेतर्फे विरार आणि बोरीवली दरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे भूसंपादनाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रेल्वेने प्रसिध्द केलेली अधिसूचना चुकीच्या भूमापन क्रमांकाची आहे त्यामुळे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रश्नावर नागरिकांच्या समस्या ऐकून तोडगा काढण्यासाठी गुरूवारी रेल्वे परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेवरील विरार-बोरिवलीदरम्यान नव्याने ५ आणि ५ क्रमांची मार्गिका टाकली जाणार असून ३० ट्रॅकचे यार्ड तयार केले जाणार आहे. यामुळे वसई पश्चिमेकडील ५ उमेळे, उमेळमान, दिवाणमान, माणिकपूर आणि नवघर या गावातील घरे बाधित होणार आहेत. याविरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मंगळवारी उमेळ गाव बचाव समितीने मंगळवारी रेल्वेच्या अधिकार्यांची भेट घेतली. रेल्वे रुळालगत असलेली भूमापन क्रमांक १२१ (अ) ही शासकीय जागा आहे. मात्र रेल्वेने भूमापन क्रमांक २१ ची नावे देण्यात आली आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. या संदर्भात मंगळवारी उमेळे गाव बचाव समितीने रेल्वे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितले. यावेळी रेल्वेने गावात येऊन नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हेही वाचा >>>यंदा मासळी सुकविण्याच्या बांबूच्या पराती रिकाम्या, मत्स्य दुष्काळाचा परिणाम
गुरूवारी रेल्वे परिषदेचे आयोजन
रेल्वेच्या या भूसंपादनामुळे वसईतील ५ गावातील ग्रामस्थ हवालदील झाले आहे.रेल्वेकडून अधिसूचना जारी केल्यानंतर याबाबतीत अनेक संभ्रम, समज-गैरसमज तयार केले जात आहेत. बाधित गावातील नागरिक यामुळे तणावात असून नागरिकांची भूमिका तसेच त्यांची मागणी व समस्या जाणून घेण्यासाठी पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘रेल्वे परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार ७ मार्च सकाळी १०:३० वाजता वसईच्या पश्चिमेच्या आनंद नगर येथील विश्वकर्मा सभागृहात ही परिषद होणार आहे.