वसई : मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात वसई पश्चिमेतील सनसिटी- गास रस्ता हा पाण्याखाली जाऊ लागला आहे. यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन या भागात राहाणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी या रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वसई पश्चिमेतील भागातून सनसिटी-गास रस्ता गेला आहे. या रस्त्यावरून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. परंतु पावसाळ्यात या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचून हा रस्ता पाण्याखाली जाऊ लागला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात सदर सनसिटी—गास रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिराच्या पुढे असलेल्या मोरीपासून जवळपास अर्धा किलोमीटर रस्ता हा पाण्याखाली गेलेला असतो. तीन ते चार फूट पाणी रस्त्यावर असल्याने सदर रस्त्याने वाहतूक विस्कळीत होऊन येथील संपर्क तुटतो. तसेच येथील पुराचे पाणी ओसरण्याससुद्धा आठवडाभराचा कालावधी लागतो.
यामुळे गास, भुईगाव, निर्मळ परिसरांतील नागरिकांना जुन्या वसई पश्चिमेकडील बंगली रस्त्याने वळसा घालून प्रवास करावा लागतो. यात वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाया जात आहे. रस्त्यावर पाणी आल्यामुळे काही जण पाण्यात वाहने टाकून जबरदस्तीने प्रवास केल्याने वाहनेदेखील नादुरुस्त होतात. तसेच, जबरदस्तीने पाण्यातून प्रवास केल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. नुकताच झालेल्या तौक्ते चक्रीवादळ व पावसामुळे सदर रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचले होते. त्यामुळे चार दिवस सदर रस्त्यावरून नागरिकांचा प्रवास ठप्प होता.
सनसिटी-गास रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिराच्या पुढील मोरीपासून अर्धा किलोमीटरच्या पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढवावी किंवा आपत्कालीन सोय म्हणून रस्त्यावर दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश सरवणकर यांनी पालिकेकडे केली आहे.