पाऊस लांबला तरी वसई-विरारमध्ये पाणीकपात नाही
वसई: वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा मुबलक असल्याने वसईकरांना पाणीटंचाई भेडसावणार नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या योजनेच्या धामणी धरणात तब्बल २८० दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. सध्या शहराला सूर्या पाणी प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतून २०० दशलक्ष लिटर्स, पेल्हार धरणातून १० दशलक्ष लिटर्स आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर्स एवढा पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या पालिकेच्या क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणात २५.२९ टक्के इतका आहे. हा साठा २८० दिवस पुरेल एवढा आहे. पेल्हार धरणात ३१. ०४ टक्के पाणी साठा शिल्लक असून तो ७० दिवस पुरू शकेल. उसगाव धरणात २१.९१ टक्के असा पाणीसाठा असून तो ४० दिवस पुरू शकणार आहे. यामुळे यंदा पाऊस जरी लांबला तरी पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार नाही. या तिन्ही धरणामध्ये शिल्लक पाणीसाठा असल्यामुळे त्याचे योग्य नियोजन करून पाणी वसई-विरार शहराला पुरविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. पालिकेने नुकतीच मान्सूनपूर्व कामांची दुरुस्ती पूर्ण केली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणी असले तरी शहराच्या अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. शहराला २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत असला तरी विविध कारणांमुळे पाण्याची गळती होत आहे. सध्या गळतीचे प्रमाण हे २१ टक्कय़ांवर आहे. त्यामुळे सुमारे ४३ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा कमी होत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. ठिकठिकाणी होणारी गळती, जुन्या जलवाहिन्या यामुळे ही गळती होत असते. पूर्वी गळतीचे प्रमाण हे २९ टक्के होते. त्यानंतर पालिकेने ठिकठिकाणी दुरुस्तीची कामे केली होती. तेव्हा प्रमाण २१ टक्कय़ांवर आले. शहरातील जलवाहिन्या अंथरण्याचे काम पूर्ण झालेले नाही, तसेच जलकुंभ उभारण्याचे काम अर्धवट राहिले आहेत. त्यामुळे अनेक भागात पाणी मिळत नाही. शहरातील अनेक नवीन वसाहतींमध्ये सध्या टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या भागातील वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना पाणी नियमित मिळेल, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
खोलसापाडा, देहरजी योजनेवर काम सुरू
भविष्यात वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढणार आहे. एमएमआरडीएच्या विकास आराखडय़ानुसार शहरातील लोकसंख्या पुढील २० वर्षांत ४५ लाख होणार आहे. त्यामुळे पालिकेने वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी विविध योजनांवर काम सुरू करण्यात आले आहे. खोलसापाडा धरणाच्या टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ चे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी २३१ कोटी ९० लाख रुपयांची तरदूत करण्यात आली आहे. खोलसापाडा टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ या स्वतंत्र योजना आहेत. त्यातून पालिकेला ७० दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. डहाणू व्यतीगाव येथील धरणातून १८० दललक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जाणार आहे.
राजावली, तिल्हेह, सातिवली येथे साठवण तलाव
डहाणू येथील व्यती गावात हा पाणी प्रकल्प राबविण्यात आहे. परंतु हा प्रकल्प विविध प्रकारच्या अडचणीमुळे रखडला होता. हा सूर्या जलशुद्धीकरण प्रकल्प एमएमआरडीए यांच्या मार्फत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम हाती घेऊन वसईला १८० दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय पालिकेने देहरजी धरणाचे काम हाती घेतले असून राजावली, तिल्हेह आणि सातिवली या ठिकाणी साठवण तलाव करण्याचे काम हाती घेतले आहे.