वसई: वसई विरार शहरात रविवारी प्रभू श्री राम नामाचा गजर करत रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या रामनवमी निमित्ताने वसई विरार मधील श्री राम मंदिरात सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. महाआरती, अभिषेक, प्रसाद, कीर्तन, भजन, पालखी सोहळा, मिरवणुका असे कार्यक्रम पार पडले.
विरार पूर्वेच्या खानिवडे येथील श्रीराम मंदिरात ही भाविकांनी दर्शनासाठी बुधवारी सकाळ पासून गर्दी केली होती. तसेच यानिमित्ताने भजन, कीर्तन आणि श्रीराम जयकाराची १६१ वर्षाची परंपरा कायम ठेवत उत्सव साजरा केला. पालखी सोहळा, रामरक्षा पठण, पूजापाठ असे विविध कार्यक्रम पार पडले.
तर विरार पश्चिमेच्या अर्नाळा जुन्या कोळीवाड्यातील पुरातन राममंदिरात मागील दीडशे वर्षापासून राम नवमी चा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. बदलत्या शहरीकरणात कोळीवाडा जरी दूर झाला असला हे रामाचे मंदिर येथील आगरी कोळी बांधवांचा एकोपा व नातेसंबंध टिकवून ठेवण्यास महत्वाचे ठरत असल्याचे येथील नागरिक निनाद पाटील यांनी सांगितले आहे.
गुढी पाडव्या पासूनच या मंदिरात उत्सवाची सुरुवात झाली असून भजन कीर्तन, राम नामाचा जप असे कार्यक्रम पार पडत आहे. विशेषतः राम नवमीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.यात कोळी बांधवांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.
विरार पश्चिमेकडील डोंगरपाडा येथील १०० वर्षांहून जुन्या श्री राम मंदिरात सनई आणि तबल्याचे सूर पसरले होते. नाळा गावातील काही वर्षांपूर्वी जिर्णोद्धार झालेल्या राम मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.
तसेच कामण येथे ग्रामस्थांनी रामनवमी निमित्ताने मिरवणूक काढली हाती यात मोठ्या संख्येने नागरिक भगवे फेटे, पारंपारीक वेशभूषा करून सहभागी झाले होते. तर श्रीरामाच्या रथ यात्रेच्या स्वागतासाठी घरासमोर व रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या.
विरारच्या डोंगरपाडा, नाळे , जूचंद्र, पोमण,आगाशी, चाळपेठ , नालासोपारा, माणिकपूर, वसई गांव, नायगाव येथे श्री राम मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण पहायला मिळाले. अनेक राम मंदिरांत आकर्षक रांगोळ्या, फुलांची आरास यामुळे मंदिर व परिसर फुलून गेला होता.
‘जय राम श्री राम, जय जय राम ‘अशा राम नामाच्या गजराने वसई विरार नगरी दुमदुमली होती.
मिरा भाईंदरमध्येही राम नवमीचा उत्साह
मिरा भाईंदर शहरातही भक्तांनी मोठ्या उत्साहात राम नवमीचा सण साजरा केला. यात शहरातील साई मंदिरात राम नवमी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याशिवाय महाप्रसाद व कीर्तनामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. तसेच भाईंदर पश्चिमेच्या राई व मुर्धा या गावात राम नवमीनिमित्ताने यात्रोत्सव ही पार पडत आहे.