लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : सावत्र मुलीवर बलात्कार तसेच पत्नीची हत्या करून फरार झालेल्या एका आरोपीला २१ वर्षानंतर गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अटक केली आहे. साजिद अली शेख उर्फ परवेज उर्फ इडली असे या आरोपीचे नाव आहे. आपले नाव बदलून तो धारावीच्या झोपडपट्टीत राहत होता.
आरोपी साजिद अली शेख हा ट्रक चालक आहे. तो विरार मध्ये राहत होता. त्याने एका महिलेची लग्न केले होते. त्याला अठरा वर्षाची सावत्र मुलगी होती. साजिद या मुलीला धमकावून वेळोवेळी बलात्कार करत होता. या संबंधातून ती गर्भवती राहिली होती. अखेर कंटाळून मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने पतीला जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात भांडण झाली होती. २० मे २००४ रोजी साजिद शेखने मारहाण करून पत्नीची हत्या केली आणि फरार झाला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात हत्या तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. विरार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला मात्र त्यांचा हाती काही लागले नाही.
..एका छायाचित्रावरून शोध घेण्याचे आव्हान
पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी या गुन्ह्याचा नव्याने तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखा २ च्या पथकाला दिले होते. मात्र त्यांच्याकडे २१ वर्षापूर्वीचा आरोपी शेख याचा फोटो होता. केवळ त्या फोटोवरून त्याचा माग काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे पुढे होते. साजिद शेख हा ट्रक चालक असल्यामुळे पोलिसांनी त्याची माहिती काढली. तो हैदराबाद आणि गुजरात येथे काही वर्ष वास्तव्यास होता. तेथे देखील पोलिसांनी जाऊन माहिती काढली. तो मुंबईच्या धारावी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. धारावी हा परिसर प्रचंड मोठा आणि झोपडपट्टीचा आहे. तेथून आरोपीला शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते.
सर्वेक्षण करणारे कर्मचारी बनून सापळा
पोलिसांनी धारावी परिसरात जाऊन माहिती काढण्यास सुरुवात केली त्यावेळी आरोपी शेख याच्यासारखा दिसणारा एक इसम परवेज उर्फ इडली या नावाने वावरत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक निवडणूक सर्वेक्षण करणारे कर्मचारी बनले आणि परवेज उर्फ इडली याच्या घरात जाऊन माहिती काढली. त्यावेळी परवेज उर्फ इडली वाला हाच साजिद शेख असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सध्या तो ५५ वर्षांचा असून धारावी मध्ये टेम्पो चालक म्हणून काम करतो.
गुन्हा केल्यानंतर आरोपी आपली ओळख लपवून वावरत होता. त्यामुळे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे होते. अखेर कसोशीने तपास करून आम्ही त्याला अटक केली अशी माहिती गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांनी दिली.
पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे) सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद बल्लाळ (गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा २ च्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर अहीरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गीते, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रवींद्र पवार, मुकेश पवार, सचिन पाटील, प्रुफल्ल पाटील, चंदन मोरे, राजाराम काळे, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकूर, पोलीस अंमलदार, अकील सुतार, राहुल कर्पे, अनिल सावळे, अजित मैड, प्रतीक गोडके, राजकुमार गायकवाड आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून या आरोपीला अटक केली.