वसई- वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात एकूण २१ परिचारिकांची भरती केली जाणार आहे. ठेका पध्दतीने पुढील एक वर्षांसाठी ही भऱती होणार आहे. मात्र मुलाखत न घेता शैक्षणिक पात्रतेच्या आधारे गुणांकन पध्दतीने ही निवड केली जाणार आहे.वसई विरार महापालिकेने आरोग्य सेवेचा विस्तार करण्यास सुरवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नागरी अभियान (एनयूएचएम) योजने अंतर्गत २१ अधिपरिचारिकांची (जीएनएम) नियु्कती केली जाणार आहे. त्यात ३ पुरूष अधिपारिचारिकांचा समावेश आहे.
करार तत्वावर ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने ११ महिने २९ दिवसांसाठी ही नियुक्ती केली जाणार आहे. या अधिपरिचारिकांना एकूण ३४ हजार ८०० रुपये एवढा पगार दिला जाणार आहे. त्यातील २० हजार केंद्राकडून तर १४ हजार ८०० रुपये पालिकेकडून दिले जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत २८ फेब्रुवारी रोजी आहे. उमेदवारांचे अर्ज पालिका मुख्यालयात प्रत्यक्षात स्विकारले जाणार आहेत.
हेही वाचा >>>आमदार टी राजा यांचे मिरा रोड येथे शक्ती प्रदर्शन, चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह भाषा
महिला अधिपरिचारिकांमध्ये अनुसूचित जाती (एससी) १, अनुसूचित जमाती (एसटी) ३, भटक्या आणि विमुक्त जाती (व्हीजएनटी) प्रत्येकी १, विशेष मागासवर्ग १, इतर मागास वर्ग १ (ओबीसी) ३ आणि आर्थिक मागासवर्गासाठी (ईडब्ल्यूएस) ४ जागा राखीव आहेत. तर ३ जागा खुल्या वर्गासाठी राखीव आहेत. पुरूष अधितपरिचारीका पदासाठी अनुसूचित जातीसाठी (एससी) १ आणि इतर मागासवर्गींयासाठी (ओबीसी) १ अशा दोन जागा राखीव असून १ जागा खुल्या (ओपन) वर्गासाठी आहे.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत प्रकल्प अमलबजावणी आराखड्यानुसार मंजुर पदांपैकी रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात काढल्याची माहिती उपायुक्त (आरोग्य) विनोद डवले यांनी दिली.