करोनामुळे भाईंदर, मीरा रोड ला फटका; दोन वर्षांपूर्वी रेल्वे मंडळाची मान्यता

भाईंदर : पश्चिम रेल्वे मार्गावरील मीरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्याकरिता दोन वर्षांपूर्वी रेल्वे मंडळाने मान्यता दिली आहे. मात्र गेल्या दीड वर्षांपासून करोनाचे संकट डोक्यावर असल्याने या कामाला विलंब होत असल्याचे समोर आले आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील भाईंदर आणि मीरा रोड ही महत्त्वाची रेल्वे स्थानक आहे. दररोज हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असतात. प्रवाशांची संख्या वाढत असली तरी त्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाईंदर आणि मीरा रोड रेल्वे स्थानकाचा विकास व्हावा म्हणून लोकसभेतदेखील मागणी करण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही स्थानकांच्या विकासाकरिता ९५० कोटी प्रस्तावाला रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे. तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या कामाच्या पाहणीसाठी पश्चिम रेल्वेचे व्यस्थापक जी. व्ही. एल. सत्यकुमार, वरिष्ठ अभियंता दुबे, एमआरव्हीसीचे मुख्य अभियंता आशुतोष माथुर यांनी संयुक्त पाहणी दौरा केला होता. त्यात पुरेशा तिकीट खिडक्या, शौचालय, उद्वाहन, सरकते जिने, आसन व्यवस्था सुधारित करून देण्याबाबत सूचना एमआरव्हीसीला करण्यात आल्या.

बोरिवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर प्रवाशांसाठी एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासह दोन अतिरिक्त लोहमार्ग करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यामुळे दोन्ही स्थानकांतून रेल्वेच्या फेऱ्यात वाढ होऊन लांब पल्ल्याच्या गाडय़ांना येथे थांबा मिळण्याकरितादेखील प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार राजन विचारेंकडून देण्यात आली होती.

मात्र गेल्या दीड वर्षांपासून करोनाचे संकट डोक्यावर आल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात येत आहे. तर या करण्यात येणाऱ्या विकासकामांकडेदेखील लक्ष दिले जात नसल्यामुळे हा पुनर्विकास जणू रखडला गेला असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

या संदर्भात सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यानंतर या स्थानकाचा संपूर्ण आराखडा तयार करून त्यानुसार काम करण्यात येईल.

– सुनील कुमार, अभियंता (रेल्वे प्रशासन)

मीरा रोड आणि भाईंदर स्थानकाच्या विकासाचे काम लवकर हाती घेण्याकरिता मी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवले आहे. त्यानुसार लवकरच बैठक घेण्यात येणार असून याविषयी संपूर्ण माहिती देण्यात येईल.

– ज्योत्स्ना हसनाळे, महापौर (मीरा भाईंदर महानगरपालिका)