लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : विधानसभा निवडणुकीपूर्वी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून बदली करण्यात आलेल्या ३६ पैकी ७ पोलिसांनी पुन्हा त्यांच्या मूळ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही २२ पोलीस प्रतीक्षेत आहे. याबदल्यांच्या विरोधात मॅट मध्ये याचिका दाखल असून त्यावर १४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

पोलिसांच्या बदल्यांचे प्रकरण चांगलेच तापले आहे. दोन जिल्हे असलेल्या आयुक्तालयात ज्या पोलीस अधिकार्‍यांना ३ वर्षे पूर्ण झाली असतील अशा पोलिसांची बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालकांना दिले होते. त्यानुसार ३० ऑक्टोबर २०२४ रोजी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३६ पोलिसांच्या मुंबई पोलीस आयुक्लयाच्या हद्दीत बदल्या करण्यात आल्या होत्या. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच बदल्या केल्याने पोलीस अधिकारी नाराज होते. त्यामुळे त्यांनी या बदल्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) मध्ये आव्हान दिले होते. मात्र जे पोलीस मुंबईतून मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात आले त्यांनी प्रतिआव्हान देत हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांमधील वाद विकोपाला गेला होता.

आणखी वाचा-मिरा भाईंदरमध्ये भटक्या मांजरांचे निर्बिजीकरण

दरम्यान, या बदल्या केवळ एक महिन्यांच्या कालावधीसाठी केल्या होत्या. त्यामुळे वसई आणि भाईंदर मधून मुंबईत गेलेल्या ३६ पोलिसांनी विनंती अर्ज देऊन बदल्या रद्द करून मुळ स्थानी परत पाठविण्याची मागणी केली होती. परंतु जागा रिक्त नसल्याने या बदल्या झाल्या नव्हत्या. अखेर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीस महासंचालकांनी ७ पोलिसांना मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील मूळ पोलीस ठाण्यात बदलीचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये संजय हजारे (मांडवी), राजेंद्र कांबळे (काशिमिरा), जितेंद्र वनकोटी (पेल्हार), चंद्रकांत सरोदे (मिरा रोड) दिलीप राख (वालीव) विलास सुपे (नया नगर) आणि वळवी (भाईंदर) आदी पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. येत्या २-४ दिवसात हे पोलीस मूळ पोलीस ठाण्यात रुजू होणार आहेत.

आणखी वाचा-नववर्षाच्या पार्टीत आवाजावरून मारहाण, जखमी तरुणाचा मृत्यू

मुंबईतील २७ पोलीसदेखील स्वगृही

याच निकषाच्या आधारे मुंबईतील १७३ आणि नवी मुंबईतील १९ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यात मुंबईतल २७ आणि नवी मुंबईतील २ पोलिसांच्या देखील त्यांच्या मूळ ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत.

मॅटमध्ये १४ जानेवारी रोजी सुनावणी

या बदल्या अन्यायकारक असल्याचे सांगत ३६ पोलीस महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणा (मॅट) मध्ये गेले होते. त्यातील ७ पोलिसांच्या स्वगृही बदल्या झाल्याने त्यांचे अर्ज निकाली निघाले आहेत. मात्र अन्य २२ पोलिसांच्या बदल्या झालेलल्या नाहीत. त्यावर आता १४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.