वसई: नायगाव पूर्वेतील टिवरी ते सेव्हन स्क्वेअरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणी निर्माण होत होत्या. याशिवाय पावसाळय़ात साचलेल्या पाण्यातून ये-जा करावी लागत होती. अखेर महापालिकेने या रस्त्याची दुरुस्ती पूर्ण केली आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नायगाव पूर्वेतील भागात टिवरी ते सेव्हन स्क्वेअरकडे जाणारा रस्ता आहे. परंतु या रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. या भागात मोठय़ा संख्येने नागरी वस्ती असल्याने या नागरिकांसह इतर भागातील नागरिकही या रस्त्याचा वापर करतात. तर विशेष करून या भागात शाळा आहे. त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी व त्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांना पावसाळय़ात या पाणी भरलेल्या रस्त्यातून प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळय़ात हा रस्ता अधिक बिकट होत होता. काही ठिकाणी साचलेले पाणी, तर काही ठिकाणी खड्डे अशातून वाट काढणे जिकरीचे बनले होते.
पावसाळय़ात चिखल तयार होऊन त्यात दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटनाही घडत होत्या. यासाठी रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेकडे केली होती. त्यानुसार २०१९ मध्ये टिवरी ते सेव्हन स्क्वेअपर्यंतच्या रस्त्याचे कामही मंजूर करण्यात आले होते. यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली होती. करोनाकाळात या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. करोनाचे संकट कमी होताच नागरिकांची समस्या लक्षात घेता या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.