वसई : मुंबईच्या वरळी येथील आदर्श नगर वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रकल्प हाणून पाडण्याचा षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. याप्रकरणी १० कोटींची खंडणी मागणार्‍या टोळीतील ५ वा आरोपी मुख्य सुत्रधार असून त्याला अटक करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. नवघर पोलिसांनी यापूर्वीच शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह ४ जणांना अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता यांच्या कंपनी चिंतारहणी तिंपुरणी एलएलपी रिॲल्टर या कंपनीतर्फे वरळीच्या आदर्श नगर येथील सागर दर्शन वसाहतीचा पुनर्विकासाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाला सर्व शासकीय परवानग्या मिळाल्या असून रहिवाशांची मंजूरी आहे. मात्र वसई विरार महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर याने या प्रकल्पाचा विरोधात तक्रारी करून १० कोटींची खंडणी मागितली होती. खंडणीच्या रकमेतील १५ लाखांचा हप्ता घेतांना ४ जणांना अटक करण्यात आली. त्यात माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर, हिमांशू शहा, निखिल बोलार आणि किशोर काजरेकर यांचा समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा केनूरकर असून त्याने स्वप्नील बांदेकर याच्या मदतीने खंडणीची योजना तयार केली आसा आरोप तक्रारदार आकाश गुप्ता यांनी केला आहे. खंडणीच्या रकमेसाठी एकूण ४४ कॉल्स करण्यात आले असून त्याच्या ध्वनीफिती नवघर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. फरार असलेल्या मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी तक्रारदार गुप्ता यांनी केली आहे.

रहिवाशांची निदर्शने

प्रकल्पाचे काम व्यवस्थित सुरू असताना खोट्या तक्रारी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. आम्हाला विस्थापित करण्याचा हा प्रयत्न असून नवघर पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी तसेच माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर याच्यासह त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली. दरम्यान अटकेत असलेल्या चौघा आरोपींच्या पोलीस कोठडीत ५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.