लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : नालासोपारा पूर्वेच्या वसंत नगरी येथील रश्मी प्राईंड या इमारतीत मद्यदुकान (वाईन शॉप) सुरू होत असून रहिवाशांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. या इमारतीत आणि शेजारी आधीच एक बार बिअरबार आहे. नवीन मद्यदुकान सुरू झाल्यास रहिवाशांना अनेक त्रासाला सामोर जावे लागणार आहे.
नालासोपारा पूर्वेला वसंत नगरी परिसर आहे. येथे रश्मी प्राईड नावाची निवासी इमारत आहे. या इमारतीलगत गॅलेक्सी हे बार ॲण्ड रेस्टॉरंट आहे तर रश्मी प्राईंड मध्ये ‘सिप ॲण्ड डाईन’ नावाचे हॉटेल आहे. त्यामुळे मद्यपींचा सतत येथे वावर असतो. हॉटेलाची कर्णकर्कश्श संगीत, मद्यपींचा मध्यरात्रीपर्यंत चालणारा गोंधळ यामुळे रहिवाशी त्रस्त आहेत. आता याच रश्मी प्राईड इमारचीच्या एका दुकानात मद्य दुकान सुरू केले जाणार आहे. याची माहिती मिळताच रहिवाशी संतप्त झाले आहेत. आधीच एक रेस्टॉरंट आणि बार आहे. त्यात मद्यदुकाने वाढल्याने मद्यपाींचा गोंधळ वाढेल, असे येथील रहिवाशी मीना चौहान यांनी सांगितले.
विविध प्रकारचे लोक या बार ॲण्ड रेस्टॉरंट मध्ये येत असतात. त्यांची वाहने तेथे उभी असतात, त्यामुळे रहिवाशांना असुरक्षित वाटत आहे. महिला आणि मुलांना येणे-जाणे देखील त्रासदायक ठरू लागले आहे, असे सुधा शुक्ला या महिलेने सांगितले. रश्मी प्राईंड ही इमारतीची नोंदणी २०१३ मध्ये झाली. दुकान मालकाने पुर्वीच्या पदाधिकार्यांना हाताशी धरून २०१९ मध्ये मद्यदुकान (वाईन शॉप) चा परवाना मिळवला होता. परिसरात शाळा, मंदिर आहे. त्यामुळे आता या मद्यदुकानाला परवानगी देऊ नये असे रहिवाशी श्रीधर राव यांनी सांगितले.
पालघर येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकदरबाराचे आयोजन केले होते. इमारतीच्या महिला त्यांना भेटायला गेल्या आणि आपली कैफियत सांगितली. सरनाईक यांनी तात्काळ उत्पादनशुल्क विभागाच्या अधिकार्यांना यासंदर्भात तपासणी करून मद्यदुकान सुरू करू नये असे निर्देश दिले आहेत. येथील रहिवाशांना स्थानिक पोलीस ठाण्याला निवेदन दिले आहे. रहिवाशांचा मद्यदुकानाला विरोध आहे. त्यामुळे परवागनी देऊ नये असे आम्ही उत्पादनशुल्क विभागाला कळवू असे आचोळे पोलिसांनी सांगितले.
‘त्या’ मोकळ्या जागेत मद्यपींचा अड्डा
याच परिसरात ४१ अनधिकृत इमारती होत्या. नुकत्याच पालिकेने सर्व इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. आता तो परिसर मोकळा आणि निर्जन झाला आहे. त्यामुळे तेथे रात्रीच्या वेळी नशेबाज आणि मद्यपी लोकांची वर्दळ वाढली आहे. गाड्या घेऊन तरुणांचे टोळके तेथे मद्यपान करण्यासाठी येत असते. गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढला आहे. ही बाब रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.