वसई : उन्हाळय़ाची सुट्टी लागल्याने नागरिकांची पावले आता वसई विरारमधील समुद्रकिनाऱ्यांवर असलेल्या रिसॉर्टकडे वळू लागली आहेत. वसई विरारसह मुंबई, ठाण्यातील पर्यटक या रिसॉर्टमध्ये येत असतात. मात्र रिसॉर्ट पर्यटकांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. तरणतलावात बुडून पर्यटकांचे मृत्यू होत आहेत. बहुतांश रिसॉर्ट हे बेकायदा असून या रिसॉर्टमध्ये बेकायदा मद्य विक्री होत आहे.
वसईच्या पश्चिम सागरी किनाऱ्यालगत असलेल्या वसई गाव, भुईगाव कळंब, राजोडी, अर्नाळा, वटार, रानगा, तसेच पूर्वेकडील भालिवली, तिल्हेर, वज्रेश्वरी, कौलार, मांडवी अशा भागांत अनेक रिसॉर्ट उभारण्यात आली आहेत. उन्हाळय़ाची सुट्टी लागल्याने आता नागरिक मोठय़ा संख्येने या रिसॉर्टमध्ये येत आहेत. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने रिसॉर्ट धोकादायक ठरत आहेत. बहुतांश रिसॉर्टमध्ये जीवरक्षक नसल्याची बाब समोर आली आहे. जरी असले तरी काही वेळा त्यांचे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे तरणतलावात बुडून मृत्यू पावणाऱ्यांची संख्यादेखील वाढतच आहे. मागील चार महिन्यांत या रिसॉर्टमध्ये बुडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तरणतलावांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून बैठका घेतल्या जात आहेत. त्यांनाही जीवरक्षक ठेवणे, योग्य ती काळजी घेणे, क्षमतेपेक्षा अधिक पर्यटक घेऊ नयेत अशा सूचना करण्यात येत असल्याचे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले. नागरिकांनीही सावधानता बाळगावी, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बेकायदा रिसॉर्ट,मद्य विक्री
या भागातील बहुतांश रिसॉर्ट बेकायदा असून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. या रिसॉर्टमध्ये बेकायदेशीर मद्य पुरविण्यात येते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नुकतीच कारवाईदेखील करण्यात आली होती. वीकेंडला शहरातील रिसॉर्टमध्ये मोठय़ा संख्येने पर्यटक येत असतात. काही रिसॉर्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक पर्यटक घेतले जातात.
मागील चार महिन्यांतील रिसॉर्टमधील दुर्घटना
७ एप्रिल २०२३
कळंब येथील एका शीतल समुद्र मिनी गोवा रिसॉर्टच्या तरणतलावात बुडून चैतन्य कथायत या पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
२१ एप्रिल २०२३
राजोडी येथील क्षितिज रिसॉर्टमध्ये लक्की पवार (१९) या तरुणाचा तरणतलावात बुडून मृत्यू.
२३ जानेवारी २०२३
विरार पूर्वेच्या मांडवी रिसॉर्टच्या घसगुंडीत अडकून अंजना गाला (७२) या महिलेच्या अंगठय़ाचे बोट तुटले.