वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत व इतर ठिकाणच्या भागात मोठ्या प्रमाणात कायदेशीर माती भराव केला जात आहे. या बेकायदेशीर आता माती भराव प्रकरणी वसईच्या तहसील विभागाने भराव केलेल्या जागांवर बोजा (दंड) चढविण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षभरात ३३ प्रकरणात २४२ कोटी १५ लाखांचा बोजा सातबाऱ्यावर चढविला आहे.

वसई विरार शहर झपाट्याने विकसित होत असल्याने येथील विकासकामे अधिक जोमाने सुरू आहेत. विविध ठिकाणी जागा खरेदी विक्रीचे व्यवहार ही जोरात सुरू आहेत. अनेक भागात माती भराव करून जागा सपाटीकरण करवून घेतल्या जात आहेत. माती भराव करताना महसूल विभागाकडून परवानगी (रॉयल्टी ) काढावी लागते.  त्यातून महसूल विभागाला महसूल मिळतो.

मात्र काही भागात टाकण्यात येणारा माती भराव कोणत्याही रॉयल्टी विनाच केला जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहे.  काही ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच केला जात असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे आल्या आहेत.

या माती भराव प्रकरणी ज्या भागात माती भराव झाला आहे त्या भागातील भू धारकांना तहसिल विभागाने नोटिसा बजावल्या होत्या. त्यांनी भराव करताना परवानगी घेतली होती का ? माती परवाने अशा सर्व बाबींची चौकशी करून त्यावर आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

गास, मालजीपाडा, कोल्ही, सकवार, जूचंद्र, बिलालपाडा, मोरी, चिंचोटी, राजावळी, सांडोर, बापाणे, शिरवली, विरार, शिरगाव, चिखलडोंगरे, दहिसर, शिरसाड, बोळींज, सातीवली, अशा विविध ३३ ठिकाणी रॉयल्टी न काढताच माती भराव केला असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी वर्षभरात महसूल विभागाने सुमारे २४२ कोटी १५ रुपये ३१ हजार ६६८ रुपये इतका बोजा सातबाऱ्यावर चढविण्यात आला असल्याची माहिती तहसील विभागाने दिली आहे. अन्य भागातही कायदेशीर माती भराव प्रकरणांची चौकशी सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

“माती भराव करताना महसूल विभागाची परवानगी न घेताच बेकायदेशीर माती भराव करीत आहेत. त्यांना नोटिसा पाठवून कारवाई केली जात आहे. यापूर्वी ज्यांनी भराव टाकून नैसर्गिक मार्ग बंद केले त्यावर ही गुन्हे दाखल केले आहेत.”- डॉ अविनाश कोष्टी, तहसीलदार वसई

राडारोड्याच्या नावाखाली माती भराव

वसई विरार शहरात राडारोड्याच्या नावाखाली बेकायदेशीर माती भरावाचे प्रकार समोर येत आहेत. राड्यारोडा (डेब्रिज) हा गौण खनिज मध्ये येत नसल्याने त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई होत नसल्याने हा प्रकार वाढीस लागला आहे. माती भरावासाठी महसूल विभागाकडून परवाने (रॉयल्टी) दिली जाते. त्यातून महसूल विभागाला महसूल मिळतो.  मात्र त्यातून आता भूमाफियांनी पळवाट काढत राडारोडा माती मध्ये मिसळून माती भराव केला जात असल्याचे प्रकार घडू लागले आहे. अर्धी माती व त्यावर राडारोडा टाकून महसूल विभागाची फसवणूक करण्याचे काम भूमाफियांनी सुरू केले आहे.त्यावर ही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना मातीभराव नसतानाही बोजाच्या नोटिसा

शेतजमिनीत माती भराव टाकला नसताना सुद्धा शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या बोजाची नोटीस पाठविली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. गाव मौजे मालजीपाडा येथील सर्व्हे क्रमांक २४ मध्ये विविध सातबाऱ्यावर एकूण ४६ शेतकरी आहेत. आमच्या जागेत माती भराव झाला नसतानाही आमच्यावर महसूल विभागाने सुमारे १४ कोटीच्या बोजाची नोटीस दिली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. प्रत्यक्ष पाहणी करताना संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या शहानिशा न करताच चुकीचा अहवाल सादर केल्याने असा प्रकार झाला असून त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. माती भराव नसताना लावण्यात आलेल्या बोजा तात्काळ रद्द करावा अशी मागणी ही शेतकरी बांधवांनी केली आहे.