सायकल मार्गिका तयार करताना पाणी जाण्याचे मार्ग अरुंद झाल्याचा परिणाम
वसई : वसई पश्चिमेतील सनसिटी येथे पालिकेने सायकल मार्गिका तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे येथील पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग आणखीनच अरुंद झाल्याने पावसाळ्यात या भागासह आजूबाजूच्या भागाला पूरस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तविण्यात येत आहे.
वसई पश्चिमेतील परिसरात सनसिटी परिसर असून याच भागात पालिकेतर्फे नागरिकांना विनाअडथळा सायकल चालविता यावी म्हणून गास सनसिटी रस्त्यालगतच हे काम सुरू केले आहे. यामुळे या भागात मातीचा भराव टाकण्यात आला तर पाणी जाण्याचे जे नैसर्गिक मार्ग आहेत त्या ठिकाणी नाले टाकण्यात आले आहेत. यामुळे येथील पाणी जाण्याचे मार्ग अरुंद झाले आहेत. तसेच या ठिकाणच्या भागात पावसाळ्यात आजूबाजूच्या गास, चुळणा, सांडोर, गिरीज यासह इतर ठिकाणचे पाणी येऊन जमा होण्यासाठीचा धारण तलाव आहे. परंतु पाणी जमा होण्यासाठीची जागाच गिळंकृत झाल्याने आजूबाजूच्या भागातून वाहून जाणारे पाणी जाणार कुठे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मागील काही वर्षांपासून हा रस्ता पाण्याखाली जात आहे. तर आजूबाजूच्या गावातही पाणी शिरते यामुळे येथील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. चुळणे गावात तर सलग सात- आठ दिवस पाणी साचून राहते यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग मोकळे व उघाडय़ा मोठय़ा तयार कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जाते परंतु त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे जागृती सेवा संस्थेचे जॅक गोम्स यांनी सांगितले आहे.
त्यातच आता काही स्तरातून गास सनसिटी रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. यामुळे आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण होऊन मोठय़ा प्रमाणात पाणी गावात साचून मोठा नागरिकांना फटका बसेल असे त्यांनी सांगितले आहे.