वसई: शहरात रात्रीच्या सुमारास अनधिकृत व नियमबाह्य पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या रिक्षांना आवर घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने भरारी पथके सक्रिय केली आहेत. मागील पाच दिवसात २४० रिक्षांवर कारवाई करीत ४५ रिक्षा जप्त केल्या आहेत. वसई विरार शहराच्या वाढत्या लोकसंख्ये सोबत रिक्षांची संख्या ही बेसुमार वाढली आहे.विशेषतः परवाने खुले झाल्या नंतर अधिक प्रमाणात रिक्षा शहरातील रस्त्यावर धावत आहेत.

तर दुसरीकडे रात्रीच्या सुमारास शहरात अनधिकृत रिक्षांची चलती जोरात सुरू आहे. कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसलेल्या रिक्षा सर्रास पणे चालविल्या जात आहेत. कोणत्याही प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागू नये यासाठी हे रिक्षाचालक रात्रीच रिक्षा घेऊन बाहेर पडत आहेत. यातील बहुतांश रिक्षाचालक हे गर्दुल्ले असून मारामारी, अरेरावी या सारखे प्रकार ही घडतात. 

या रिक्षा चालकांवर कोणताही अंकुश नसल्याने दिवसेंदिवस अशा रिक्षांचा सुळसुळाट वाढत आहेत. अनधिकृत पणे रिक्षा चालकांच्या विरोधात नागरिक व विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत सातत्याने परिवहन विभागाकडे तक्रारी येत होत्या. अखेर प्रादेशिक परिवहन विभागाने रात्रीच्या सुमारास अनधिकृत रिक्षा व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथके सक्रिय केली असूनन रिक्षांची तपासणी केली जात आहे. परवाना, बॅच, आवश्यक रिक्षांची कागदपत्रे या सर्व पडताळणी केली जात आहे. 

मागील पाच दिवसात ७३२ ऑटोरिक्षांची तपासणी केली असून या तपासणी करण्यात २४० रिक्षा दोषी आढळून आल्या आहेत.ज्या अनधिकृत आहेत त्या ४५ ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत १७ लाख ६७ हजार रुपये इतका दंड ही वसूल केला असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

अनधिकृत रिक्षा चालविण्याचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा अनधिकृत रिक्षांना पायबंद घालण्यासाठी विशेष मोहीम राबवून कारवाया केल्या जात आहेत.:– अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

गर्दुल्ल्या रिक्षाचालकांचा रात्रीच वावर

वसई विरार शहरात पर राज्यातील रिक्षा चालक मोठ्या संख्येने आहेत. यात बहुतांश रिक्षाचालक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. तर काही वेळा रात्रीच्या वेळेस मद्यपान करून धिंगाणा घालणे, प्रवाशांना दादागिरी करणे असे प्रकार ही समोर येत आहेत. अशा रिक्षा चालकांवर अधिक तीव्र कारवाई करून  सर्वसामान्य रिक्षाचालक व प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

Story img Loader