विरार : विरार पूर्वेत भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपीने तरुणावर चार गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. परंतु नेमकं कोणत्या कारणामुळे तरुणावर हल्ला झाला हे अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. समय चौहान असं मृत तरुणाचं नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, मनवेल पाडा रोड येथील नालासोपारा विरार ९० फुटी रस्त्यावर समय चौहान नावाच्या तरुणावर दोन अद्यात दुचाकीस्वारांनी गोळीबार केला आहे. यात समय चौहान गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र त्याचा मृत्यू झाला आहे. समय चौहान हा व्यापारी असून फर्निचर आणि बाजार भरविण्याचे काम करत होता, अशी माहिती मिळत आहे.
आरोपींनी समयवर चार गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, समय चौहान फुलापाडा येथील विकासक निशांत कदम याच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप केला जात होता. परंतु याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.