वसई : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणात नया नगर पोलिसांनी ठाणे सत्र न्यायालयात १२०० पानांचे दोषारोपत्र सादर केले आहे. आरोपी मनोज साने याने विष पाजून त्याची ‘लिव्ह इन पार्टनर’ सरस्वती वैद्यची हत्या केली होती. त्यानंतर करवतीने तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून कुकरमध्ये शिजवले होते. पोलिसांनी याप्रकरणी एकूण ६२ साक्षीदार तपासले आहेत.
मीरा रोड मनोज साने (५६) हा सरस्वती साने (३२) हिच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होता. ३ जूनच्या रोजी त्याने सरस्वतीची हत्या करून करवतीने तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले होते. हाडे आणि मांस वेगळे करण्यासाठी तो कुकरमध्ये शिजवत होता. पोलिसांना घरात असंख्य तुकडे सापडले. ते कुकर, ३ पातेले आणि २ बादल्या भरून होते. शेजाऱ्यांनी दुर्गंधी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा >>> वसई: शान’ सिनेमाच्या पात्रांप्रमाणे करायचे ठकसेनगिरी; हातचलाखीने लोकांना लुबाडणारी ठकसेन जोडी गजाआड
नया नगर पोलिसांनी मनोज साने याला अटक केली होती. पोलिसांनी घटनास्थळावरूनच पुरावे सापडले असले तरी आरोप सिद्ध करम्ण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक वैद्यकीय तसेच न्यायवैद्यक चाचण्या कराव्या लागल्या होत्या. मनोज साने पोलिसांची दिशाभूल करत होता. मृतदेहाचे असंख्य तुकडे करून शिजविल्याने वैद्यकीय पुरावे मिळवणे पोलिसांना आव्हानात्मक बनले होते. अखेर पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र (चार्जशिट) न्यायालयात सादर केले आहे.
१२०० पाने, ६८ साक्षीदार ..
या प्रकरम्णी नया नगर पोलिसांनी तब्बल १२०० पानांचे दोषारोपत्र तयार करून ठाणे सत्र न्यायालयात सादर केले आहे. त्यामध्ये एकूण ६८ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. त्यात विष, कटर, प्लास्टिक ज्या दुकानातून घेतले त्या दुकानदारांचे जबाब आहेत. शेजाऱ्यांपासून न्यायवैद्यक कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आरोपी मनोज साने याचे हत्येपूर्वी ६ महिन्यांपासून सरस्वती वैद्य बरोबर भांडण सुरू होते. त्यामुळे त्याने सरस्वतीला मारण्याची योजना बनवली होती. ताकामधून विष दिले होते. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावली असे या दोषारोपत्रात म्हटले आहे. हत्या केल्यानंतर साने याने मृतदेहासोबत ३५ छायाचित्रे काढली होती. त्याला मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवून पोलिसांनी ती छायाचित्रे पुन्हा मिळवली आहेत.