वसई : वसई आणि नालासोपारा शहरातील पाणी वाहून नेणार्या नायगाव पासून ससुनवघर खाडीची रुंदी कमी होऊ लागली आहे. ससुनवघर खाडीच्या दोन्ही बाजूला तिवरांची झाडे वाढल्याने ४० मीटर असलेली खाडी १५ मीटर झाली आहे. त्यामुळे वसई विरार मध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेचे बहुतांश पावसाळी पाणी हे नवघर पूर्व ते जूचंद्र मार्गे ससुनवघर खाडीमार्फत समुद्राला मिळत असते. वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर नदीचे पाणी या खाडीला मिळते. याशिवाय पेल्हार, वालीव, सातीवली, गोखिवरे, नालासोपारा पूर्व, एव्हरशाईन, वसंत नगरी, नालासोपारा पश्चिमेकडील गास, निर्मळ, सांडोर, सालोली आणि नवघर-माणिकपूर या वसईच्या पश्चिम भागातील पाणी रेल्वे कल्व्हर्ट क्र. ७८ मार्गे जूचंद्र खाडी आणि तेथून ससुनवघर खाडीला मिळते. या ससुनवघऱ खाडीतून पूर्वी पाणी समुद्राला मिळत होते. मात्र आता खाडीचे पात्र अरूंद झाले आहे. विकास आराखड्यात सध्या अस्तित्वात असलेल्या खाडीची रुंदी ४० मीटर होती. मात्र सद्यपरिस्थितीत ही खाडी ५ ते १० मीटर रुंद झाली आहे. त्यात दोन्ही बाजूला तिवरांची झाडे वाढली आहेत. पावसाळ्यात वाहून आलेला कचरा या तिवरांना अडकल्यास पाण्याचा प्रवाह आणखीन कमी होऊन शहरात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होणार आहे.
नायगाव खाडीचे पात्र अरूंद झाले आहे. त्यातच ससूनवघर खाडीची रूंदी कमी होत आहे. गेल्या काही वर्षांपासून ही समस्या निर्माण होऊ लागली आहे. मोठी भरती व अतिवृष्टी झाल्यास हा दोन्हीकडचा भाग संपूर्ण जलमय होतो. गोखिवरे, वालीव, नवघर पूर्व व सातीवली येथे असलेल्या औद्यौगिक वसाहती व वसईच्या पूर्व-पश्चिम परिसरात असलेल्या नागरी वसाहतीत पुरपरिस्थिती निर्माण होत असते. पर्यायाने दळणवळणात अडचण निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थी, महिला, रूग्ण व इतर सर्वांची गैरसोय होते असते.
या खाडीचे तत्काळ रुंदीकरण व्हायला हवे असे वसई विरार महापालिकेचे माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले. आम्ही तात्कालीन जलमार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच सध्याचे जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची दिल्लीत भेट घेऊन हा प्रश्न मांडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे यांना देखील निवेदन देण्यात आले होते. राज्य शासनाने हे प्रकरण महाराष्ट्र सागरी मंडळाकडे (मेरीटाईम बोर्ड) पाठवले होते. तेथून सागरी मंडळाने हे प्रकरण योग्य त्या कार्यवाहीसाठी वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे पाठविण्यात आले आहे. मात्र अद्याप निर्णय झाला नाही असे मानकर यांनी सांगितले.
एजन्सी नेमून कारवाई करणार
यासंदर्भात नुकतीच पालिका आयुक्त अनिलकुमार पवार आणि पालिका अभियंत्यासमवेत बैठक झाली होती. तिवरांची झाडे असल्याने खाडीचे रुंदीकरणं करण्यास तसेच खोली वाढविण्यात अडचण येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यावर तोडगा म्हणून एजन्सी नेमून तिवरांची गणना केली जाईल तसेच न्यायालयाच्या आदेशाने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.