वसई: नायगाव मध्ये बुधवारी संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कलंडली. मात्र चालकाने बसवर नियंत्रण मिळवल्याने अपघात टळला. स्थानिकांनी आपतकालीन दरवाज्यातून मुलांना सुखरूप बाहेर काढले. नायगाव पूर्वेच्या भागातून टीवरी फाटा रस्ता गेला आहे. या रस्त्यावरून अवर लेडी ऑफ वेलंकनी या शाळेची बस शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी निघाली होती.
मात्र याच दरम्यान सनटेक जवळील भागात पोहचताच वाहन चालकाचा अंदाज चुकल्याने रस्ता सोडून ही रस्त्याच्या कडेला गेली. यावेळी रस्त्याच्या कडेला खोलगट भागामुळे बसचा एका बाजूला तोल गेला होता. बसचा एकाच बाजूने झुकल्याने त्यात असलेली शाळकरी मुले ही घाबरली होती. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बस मध्ये असलेल्या शाळकरी मुलांना सुखरूप बाहेर काढले आहे. जवळपास यात ५० हून अधिक शाळकरी मुले होती. सुदैवाने ही बस कलंडली नाही अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. तातडीने दुसरी बस बोलावून या मुलांना बसवून घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती.