विरार : महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे विरार मध्ये एका चिमुकल्या मुलीचा बळी गेला. रस्त्यात साचलेल्या पाण्यामध्ये महावितरणाची वीज वाहक तार तुटून पडली होती. या पाण्यातुन जाताना एका पंधरा वर्षे मुलीला विजेचा धक्का लागला आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
विरार पश्चिमेकडील बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर येथील एब्रोल सोसायटीत राहणारी १४ वर्षाची तनिष्का लक्ष्मण कांबळे ही मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास शिकवणीला जात होती. रस्त्यात पाणी साचले होते. त्या पाण्यात महावीतरणाची तार तुटून पडली होती. तनिष्काचा पाय या पाण्यात पडताच तिला विजेचा धक्का लागला आणि ती खाली पडली. आजूबाजूच्या लोकांनी तिला पहिले पण पाण्यात वीज प्रवाह असल्याने तिला कुणाला वाचवीता आले नाही. नागरिकांनी महावितरण विभागाला फोन करून तातडीने वीज पुरवठा खंडित करायला सांगून तिला पाण्यातून बाहेर काढले. पण तोवर वेळ निघून गेली होती. तनिष्काचा जागीच मृत्यू झाला होता.