वसई: नालासोपारा पूर्वेच्या भागात पालिकेच्या परिवहन सेवेच्या भंगार बसला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पुन्हा एकदा भंगार बस ने पेट घेतला आहे. या आगीवर पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले आहे. नालासोपारा पूर्वेकडील सनशाइन येथे महापालिकेने भंगार झालेल्या परिवहन सेवेच्या बसेस ठेवण्यात आल्या आहेत. या बसेस अजूनही हटविण्यात न आल्याने सातत्याने आगी लागण्याच्या घटना समोर येत आहेत.
हेही वाचा >>> विवांता हॉटेल नोटा वाटप नाट्य : मालकावर आणखी एक गुन्हा, मारहाण प्रकरणी चौघांना अटक
बुधवारी पुन्हा एकदा अचानकपणे या बसेसला आग लागल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती नागरिकांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीच जीवितहानी झाली नसून भंगार बस यात जळून खाक झाली आहे. या भंगार बस पडून असल्याने धूम्रपान करण्यासाठी चरसी व गर्दुल्ले यांचा वावर वाढला आहे. या ठिकाणी आगी लागत नसून त्या लावल्या जात असल्याचा आरोप भाजपचे अल्पसंख्याक जिल्हा प्रभारी मुज्जफर घनसार यांनी केला आहे.
हेही वाचा >>> Vasai Election Result 2024: वसईत स्नेहा दुबे- पंडित ठरल्या जायंट किलर; अटीतटीच्या लढतीत ठाकूरांचा पराभव
या अशा प्रकारामुळे येथून प्रवास करण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. यासाठी या बस हटवा अन्यथा नवनिर्वाचित आमदार यांना सोबत घेऊन पालिकेच्या समोर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे. यापूर्वी रविवारी रात्रीही आग लागून सहा बस जळल्या होत्या