नैसर्गिक पाणी निचरा होण्याच्या मार्गात माती भराव टाकून अडथळे निर्माण करणाऱ्यांची शोध मोहिम सुरू केली जाणार आहे. यात जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे तहसीलदार विभागाकडून सांगण्यात आले आहे. वसई विरार शहर झपाट्याने विकसित होत असल्याने येथील विकासकामे अधिक जोमाने सुरू आहेत.अनेक भागात माती भराव करून जागा सपाटीकरण करवून घेतल्या जात आहेत. मात्र काही भागात टाकण्यात येणारा माती भराव कोणत्याही रॉयल्टी विनाच केला जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.
हेही वाचा >>> प्रलंबित वनपट्टे मंजुरीसाठी श्रमजीवी संघटनेचे प्रांत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन
तर दुसरीकडे नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग आहेत त्यावर अनिर्बंध झालेल्या माती भरावामुळे पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद होत आहेत. याचा मोठा फटका पावसाळ्यात बसत आहे. विशेषतः मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत सुध्दा जास्त प्रमाणात माती भराव केला आहे. काही ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच केला जात असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे आल्या होत्या.पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्याने पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत होते. याचा मोठा फटका नागरिकांना बसतो. त्यासाठी यंदाच्या वर्षी तहसील विभागाने माती भराव करताना नैसर्गिक मार्ग बंद तर होणार नाहीत ना याची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत अशा ठिकाणी शोध मोहीम हाती घेऊन कारवाई केली जाणार असल्याची माहिती वसईचे तहसीलदार डॉ.अविनाश कोष्टी यांनी सांगितले आहे.