वसई: महावितरणने वीज ग्राहकांना सुरक्षा ठेव जमा रकमेची वीज देयके पाठविण्यास सुरुवात केली आहे. परंतु या वीज देयकांवर ऑनलाइन भरणा करण्यासाठी बारकोड वा इतर कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे ही देयके भरण्यात ग्राहकांना अडचणी निर्माण होत आहेत.
वसई-विरार शहरात नऊ लाखांहून अधिक वीज ग्राहक आहेत. महावितरणने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या सुरुवातीलाच ग्राहकांना वीज देयकाबरोबर अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याची देयके पाठवली आहेत. ही देयके भरण्यासाठी १७ मे २०२२ची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. परंतु देयकावर कोणत्याही प्रकारचा बारकोड वा इतर कोड दिलेला नाही, तसेच महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरणा करण्याचाही पर्याय नाही. मुंबईतल्या वीज देयक कंपन्यांनी असा ऑनलाइनचा पर्याय दिलेला आहे, परंतु महावितरणने मात्र तसे काहीही करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे ही देयके भरण्यासाठी कार्यालयात रांगा लावण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. करोनानंतर आता अनेक कार्यालये पुन्हा सुरळीत चालू झाली आहेत, अशा वेळी कामाची वेळ मोडून प्रत्यक्ष कार्यालयात रांगा लावणे शक्य नाही. शिवाय अतिरिक्त सुरक्षा ठेव रकमेचा पर्याय ॲपवर आहे, पण संकेतस्थळावर नाही, असे मत ग्राहक किरण पार्टे यांनी व्यक्त केले. वीज ग्राहकांना लवकरात लवकर वीज देयकाची अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम जमा करण्यासाठी ऑनलाइन वा बारकोडचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.

Story img Loader