लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी असलेला चिंचोटी महामार्ग पोलीस विभाग आता मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत घेण्यात आला आहे. महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी चिंचोटी ही स्वतंत्र वाहतूक शाखा तयार केली आहे. पोलीस आयुक्तालयातील ही चौथी वाहतूक शाखा कार्यान्वित करण्यात आली आहे.
वसई विरार व मीरा भाईंदर शहराच्या पूर्वेकडील भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. दहिसर चेक नाका ते विरार शीरसाड फाटा २७.५० किलोमीटर ही चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलिसांची हद्द आहे. त्या ठिकाणी चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलीस यांच्या मार्फत वाहतूक नियंत्रण केले जात होते.
मात्र मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर हा महामार्ग आयुक्तालयाच्या अंतर्गत येत आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग पोलीस आणि पोलीस आयुक्तालय अशा दोन्ही यंत्रणांकडून महामार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली जात होती. जबाबदारी पार पाडत असताना दोघांमध्ये वाहतूक नियंत्रणाच्या संदर्भात समन्वय नसल्याने तसेच कार्यपद्धती वेगळ्या असल्याने सतत वाद होत होते.
विशेषतः महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर त्याचे नियोजन योग्य रित्या नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. याबाबत पोलीस आयुक्तलयात ही तक्रारी वाढल्या होत्या. आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असलेल्या महामार्गाचा पूर्ण ताबा आयुक्तालयाकडे सोपविण्यात यावा असा प्रस्ताव तयार करून शासनाच्या गृह विभागाला पाठविला होता. त्याला ही गृह विभागाने मंजुरी देऊन तेथील कर्मचारी वर्ग पोलीस केंद्र हे आयुक्तलयाकडे वर्ग केले आहे.
चिंचोटी केंद्र आयुक्तलयाकडे येताच महामार्गावरील वाहतूक समस्या व अन्य अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी स्वतंत्र वाहतूक शाखा तयार केली आहे. जानेवारी महिन्यापासून ही वाहतूक शाखा कार्यान्वित झाली असून या ठिकाणी ५ अधिकारी व ३५ कर्मचारी असे मनुष्यबळ कार्यरत ठेवण्यात आले आहे. याआधी वसई, विरार आणि काशीमिरा अशा तीन वाहतूक शाखा होत्या आता चिंचोटी तयार केलेली चौथी वाहतूक शाखा आहे.
अपघात नियंत्रणासाठी प्रयत्न
राष्ट्रीय महामार्ग असल्याने मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. अनेकदा कार व अवजड वाहनांच्या अपघाताच्या घटना घडतात. या अपघात ग्रस्तांना मदत मिळावी यासाठी तीन रुग्णवाहिका कार्यान्वित ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मध्येच जी वाहने बंद पडतात, अपघातग्रस्त वाहने हटविण्यासाठी एक छोटी आणि मोठी अशा क्रेनची सुविधा उपलब्ध आहे असे चिंचोटी केंद्राचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीच्या समस्या मोठ्याप्रमाणात निर्माण होतात. काही वेळा गंभीर अपघात ही घडतात. अशा समस्या तात्काळ सोडवण्यासाठी चिंचोटी ही स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू केली आहे. -मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त (मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय)