वसई विरार शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्या विकृताची (सीरियल मॉलेस्टर) दहशत पसरली आहे. हे विकृत रस्त्यात मुलींना अडवून त्यांना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत आहेत. या प्रकारामुळे पालकांमध्ये घबराट पसरली असून तुळींज पोलिसांनी दोन विकृत आरोपींची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यांची माहिती देणार्यास पोलिसांनी बक्षिसही जाहीर केले आहे.
दोन घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण
नालासोपारा शहरामध्ये सध्या शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्या चिमुलकल्या मुलींना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकरणी तुळींज पोलिसांमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना ५ ऑक्टोबर रोजी तर दुसरी घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली. यामध्ये अनुक्रमे ७ आणि ९ वर्षांच्या मुलींचा अज्ञात विकृतांनी विनयभंग करून लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं. या मुलींनी पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी दिली. या दोन्ही प्रकरणांत दोन विकृतांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तुळींज पोलिसांनी या दोन्ही विकृत आरोपींना पकडण्यासाठी पथके बनवली आहेत. त्यांची छायाचित्रे ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यांची माहिती देणार्यास बक्षिस जाहीर करण्यात आल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलैंद्र नगरकर यांनी दिली. पालकांनी आणि मुलींनी सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
नागपूर: लोखंडी दरवाजा अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू
२०१८ मधील ‘त्या’ प्रकरणाच्या आठवणी झाल्या ताज्या!
२०१८ मध्ये नालासोपारा शहरात अशाच एका विकृताची दहशत पसरली होती. रेहान कुरेशी नावाचा विकृत रस्त्यात शाळकरी मुलींना अडवून त्यांना आडमार्गाला नेऊन विनयभंग तसेच बलात्कार करत असल्याचं या प्रकरणात उघड झालं. नालासोपार्यातील अनेक मुलींवर त्याने अशा प्रकारे अत्याचार केले होते. मात्र फक्त ३ मुलींनी तक्रारी दिल्या होत्या. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा रोड, भाईंदर येथील २०० हून अधिक मुलींवर त्याने अशाप्रकारे लैगिक अत्याचार केल्याची उघड झाले होते. दोन वर्षे त्याची दशहत होती. नंतर त्याला गुन्हे शाखेने अटक केली.