कल्पेश भोईर
वसई : वसई विरार शहराला जोडणाऱ्या महामार्गावर विविध प्रकारच्या अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषत: अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी या घटनांचे प्रमाण अधिक असून मागील तीन वर्षांत महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात २४९ अपघाताच्या घटना घडल्या असून यात १४८ प्राणांतिक अपघात तर १०१ गंभीर अपघात घडले आहे.
नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहने चालविणे, चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटणे अशा विविध कारणांमुळे रस्ते अपघाताचे प्रमाण हे वाढू लागले आहे. वसई विरार भागातून गेलेल्या महामार्गावर तसेच तो शहराला जोडणाऱ्या विविध ठिकाणच्या मार्गावर रस्ते अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामध्ये अनेक मृत्यूसुद्धा झालेले आहेत. वाहतूक पोलिसांनी आता अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि वाहनचालकांनी सावधानता बाळगून वाहने चालवावी यासाठी पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. महामार्गावरील अशा सर्व ठिकाणांची पाहणी सुरू आहे. याच दरम्यान वसईच्या शहराला जोडणाऱ्या महामार्गावरील ११ ठिकाणच्या अपघात प्रवण क्षेत्रात २४९ इतके अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघात प्रवण क्षेत्रात किनारा ढाबा, (बसोंवा ते गुरूकृपा काठीयावाडी हॉटेल), दुर्गा माता मंदिर (गुरुकृपा काठीयावाडी हॉटेल ते दुर्गामाता मंदिर), हॉटेल रॉयल गार्डन ससूनवघर, एच.पी. पेट्रोलपंप मालजीपाडा, वासमाऱ्या पूल (लोढा धाम) बापाने पूल, हॉटेल साधना चिंचोटी पूल, बर्मा सेल पेट्रोलपंप तुंगारेश्वर फाटा, हॉटेल गोल्डन चॅरिअट, सायली पेट्रोलपंप, वसई फाटा, वंगणपाडा आदींच्या परिसराचा समावेश आहे. सर्वाधिक ४७ अपघात हे चिंचोटी येथील हॉटेल साधनाजवळील अपघात प्रवण क्षेत्रात घडले आहेत.
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना
राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग अथवा जिल्ह्यातील इतर मुख्य रस्त्यांवर सुमारे मागील तीन वर्षांत घडलेल्या अपघातांचे प्रमाण पाहता वाहतूक पोलिसांकडून अशा अपघातप्रवण क्षेत्रांची पाहणी करण्यात येऊन त्यांना ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित करण्यात येणार आहे.
रस्ते अपघात ही सध्याची एक मोठी समस्या आहे. वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. अपघातप्रवण क्षेत्रे तसेच धोकादायक वळणांवर विशेष काळजी घ्यावी. – दादाराम करंडे, वाहतूक पोलीस निरीक्षक वसई विरार