वसई- वसईतील प्रसिद्ध व्यावसायिक प्रदीप गुप्ता यांच्या सेवा विवेक केंद्रातील आयुर्वेदीक पंचक्रम केंद्रात काम करणार्‍या नोकराने गुप्ता यांच्या १७ लाखांच्या दागिने आणि मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला आहे. नालासोपारा पोलिसांनी याप्रकरणी ४८ तासात मध्यप्रदेश येथील खांडवा रेल्वे स्थानकातून आरोपीला अटक केली.

प्रदीप गुप्ता हे वसईतील प्रसिध्द व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते मुंबई अहमदाबा महामार्गावरील भालिवली येथील सेवा विवेक संस्थेचे संस्थापक तसेच मुंबई तरूण भारत दैनिकाचे विश्वस्त आहेत. सेवा विवेक केंद्राचे नालासोपारा पश्चिम येथे ‘वेदस आयुर्वेदीक’ नावाचे पंचकर्म केंद्र आहे. मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता प्रदीप गुप्ता आपल्या केंद्रात उपचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, आयफोन तसेच रॉलेक्स घड्याळ काढून ठेवले होते. त्या केंद्रात काम करणारा नोकर राकेश पांडे (३२) याने ते दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. एकूण १७ लाख ५ हजारांचा ऐवज त्याने चोरला होता. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी राकेश पांडे या अवघ्या १५ दिवसांपूर्वी या केंद्रात कामाला आला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा माग काढण्यास सुरवात केली. आरोपी पांडे मोबाईल मधील सिम कार्ड बदलत पोलिसांना चकमा देत होता. अखेर त्याने मध्यप्रदेशात पळून जाण्यासाठी ट्रेन पकडली. नालासोपारा पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेने खांडवा पोलिसांशी संपर्क साधून त्याला धावत्या ट्रेन मधून खांडवा रेल्वे स्थानकात अटक केली. गुन्हा दाखल केल्यापासून अवघ्या ४८ तासात अटक करण्यात पोलिसांनी यश आले. आम्ही मुंबईतील नामांकित एजन्सीकडून या नोकराची नियुक्ती केली होती. त्याची सर्व पडताळणी कंपनीने केली होती. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. तरी देखील त्या नोकराने चोरी केली अशी माहिती तक्रारदार प्रदीप गुप्ता यांनी दिली.

परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, पोलीस निरीक्षक अमरसिंह पाटील (गुन्हे) गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, पोलीस निरीक्षक योगेश मोरे, पोलीस हवालदार प्रशांत साळुंखे, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेंद्र नादुलकर, प्रेम घोडेराव, प्रताप शिंदे, बाबा बनसोडे, सोहल शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader