विरार : करोनाकाळात गुन्हेगारीचा खालावलेला आलेख पुन्हा करोना टाळेबंदी शिथिल झाल्याने वाढू लागला आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात एकाच दिवसात सात घरफोडय़ा आणि आठ चोरीच्या घटनाची नोंद झाली आहे.  यामुळे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

वसई विरार आणि मीरा भाईंदरमध्ये मागील काही दिवसांपासून चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढताना दिसत आहेत. दिवसाला तीन ते चार घटना या संदर्भातल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. मंगळवारी एकाच दिवशी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सात घरफोडय़ा आणि आठ चोरीच्या घटना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या घटनांना आळा घालणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

टाळेबंदी शिथिल झाल्याने नागरिक घराच्या बाहेर पडू लागले आहेत. यामुळे चोर रिकामे घर हेरून या चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वालीवमध्ये  मोबाइलच्या दुकानात ४२ हजार ६०० रुपयांची १ घरफोडी, नयानगर पोलीस ठाण्यातच्या हद्दीत राहत्या घरात मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिन्यासह रोकड मिळून ३ लाख ३५ हजारांची घरफोडी करण्यात आली. तर याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूजानगर परिसरात अशाच पद्धतीने घरफोडी करत ६९ हजारांचा ऐवज चोरण्यात आला. तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक किराणा मालाचे दुकान फोडून ३५ हजार ५०० रुपयांच्या सामानाची चोरी करण्यात आली. भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुकानात शटर तोडून १ हजार रुपयाची चोरी केली. तर वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात घरफोडीचा प्रयत्न फसला असल्याचे समोर आले आहे. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाच्या कारची काच फोडून गाडीतील १ लाखाची रोकड चोरटय़ांनी लंपास केली.  विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या इसमाची कुणीतरी रांगेत उभे असताना २५ हजारांची सोन्याची चैन चोरली. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दरवाजा उघडा असताना चोरटय़ाने घरातील २१ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला.

काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात नळ दुरुस्तीसाठी आलेल्या इसमाने कपाटातील ३ लाख ५२ हजारांचे दागिने चोरून नेले. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घराचा दरवाजा उघडा असताना एका अज्ञात चोरटय़ाने घरातील लॅपटॉप आणि मोबाइलवर  हात साफ केला आहे. तर वळीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घराबाहेर उभी केलेली दुचाकी चोरली आहे. तर अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले असताना चोरटय़ाने तीन मोबाइल चोरी केले आहेत. अशा पद्धतीने एकाच दिवसास्त १५ गुन्हे दाखल झाले आहेत.

Story img Loader