वसई: Vasai Police Academy Sexual Abuse Case लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलीस हवालदार समाधान गावडे याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर दुसरी आरोपी पोलीस हवालदार अनुजा शिंगडे हिचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपी समाधान गावडे हा नालासोपारा येथे विजयी भव नावाचे पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत होता. या केंद्रात वसई रेल्वे पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस कर्मचारी असलेला शिकण्यासाठी येणार्या मुलींचे तो लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे.
या कामात त्याची सहकारी वसई रेल्वे पोलीस ठाण्यातील कर्मचारी अनुजा शिंगाडे त्याला सहकार्य करत असल्याचा आरोप आहे. या दोघांवर विनयभंग आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्याअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. गावडे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी त्याची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालीय कोठडीत करण्यात आली आहे. तर अनुजा शिंगाडे हिला अटकपूर्व जामीन मंजुर करण्यात आला आहे.
या प्रकरणांमध्ये अनेक मुली समोर आल्या असून त्यांचे जबाब आम्ही नोंदवले आहेत. आरोपी गावडे यांचा मोबाईल तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे, अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल यांनी दिली. दरम्यान, वेगवेगळ्या क्रमांकावरून आपल्याला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव येत असल्याचे एका पीडितेने सांगितले. रविवारी रात्री आरोपी गावडे याचे काही नातेवाईक पीडितेच्या घरी गेले होते आणि तक्रार मागे घेण्याची गळ घातली होती. मात्र पीडितेच्या आईने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून मदत मागितली आणि संबंधितांना परत पाठवले. सोमवारी वसई न्यायालायने पीडित मुलींचे जबाब नोंदवून घेतले.