श्रद्धाकडून आधीच घातपाताचे संकेत
प्रसेनजीत इंगळे
विरार : वसईतील श्रद्धाच्या हत्यचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. हत्येनंतर सहा महिन्यांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र श्रद्धाने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचे संकेत दिले होते. त्याच्या मित्राला याबाबात माहिती दिली होती आणि या मित्राने तिच्या वडिलांनाही याबाबत कळवले होते. मात्र कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. कदाचित या संकेतावरून श्रद्धाचा जीव वाचला असता.
श्रद्धा वसईतील लक्ष्मण नाडार नावाच्या मित्राच्या सतत संपर्कात होती. दोन ते तीन महिन्यापासून श्रद्धाचा कोणताही संपर्क झाला नसल्याने तो चिंतेत होता. तिचा मोबाइल फोन बंद होता, तिच्या समाजमाध्यमांवरील खात्यावरही दोन ते तीन महिन्यांपासून कोणतेही अपडेट नव्हते. यामुळे त्याने तिच्या वडिलांना आणि भावाला याबाबत माहिती दिली होती. आफताब तिला नेहमी मारत होता, तिचा छळ करत होता, असे तिने त्याला सांगितले होते. ‘मला येथून घेऊन जा अथवा ही माझी शेवटची रात्र असेन..’ असेही तिने त्याला सांगितले होते. मात्र याआधीही आफताबच्या तक्रारी तिने केल्या होत्या, मात्र आफताब माफी मागून वाद मिटवत होता. त्यामुळे लक्ष्मण नाडार तिचे म्हणणे आधी गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र नंतर तिचा मोबाइल आणि समाजमाधमांवरील अपडेट बंद झाल्याने त्याचा संशय बळावला आणि त्याने तिच्या वडिलांना याबाबत माहिती दिल्याचे त्याने सांगितले.
तरुणीच्या शरीराच्या तुकडय़ांचा शोध
प्रेयसीची हत्या करणाऱ्या २८ वर्षीय आफताब अमिन पूनावाला याला दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दक्षिण दिल्लीच्या छतरपूरच्या जंगलात नेले. याच जंगलात आपली प्रेयसी श्रद्धा वालकरच्या शरीराचे तुकडे फेकून दिल्याचे आफताबने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांकडून श्रद्धाच्या अवयवाच्या तुकडय़ांचा सुमारे तीन तास शोध घेण्यात आला. दिल्ली पोलिसांना वेगवेगळय़ा ठिकाणांहून मानवी शरीराचे १३ तुकडे सापडले असून ते डीएनए चाचणीसाठी पाठवले जाणार आहेत. न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून ते तपासले गेल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
वसईत तीन ठिकाणी पती-पत्नी म्हणून भाडय़ाच्या घरात वास्तव्य
आफताब आणि श्रद्धा यांचे २०१८ पासून नातेसंबध होते. २०१९ पासून ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. आफताब आणि श्रद्धा २०१९ मध्ये नायगाव येथील यशवंत प्राईड किणी कॉम्पलेक्स मध्ये पती-पत्नी असल्याचे सांगून भाडय़ाने राहत होते. येथील भाडे करार संपल्याने त्यांनी जुलै २०२० मध्ये वसईच्या एव्हरशाईन परिसरात रिगल अपार्टमेंटमध्ये पुन्हा पती-पत्नी असल्याचे सांगून सदनिका भाडय़ाने घेतली होती. या सदनिकेचा करार ऑगस्ट २०२१ मध्ये संपला या नंतर त्याने वसईत आणखी एका ठिकाणी रूम घेतली आणि त्यानंतर तो दिल्लीत राहायला गेला होता.
१५ दिवसांपूर्वीच कुटुंबाकडून घर रिकामे
आफताब वसईच्या दिवाणमाण येथील युनिक पार्क या परिसरात २० वर्षांपासून आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचे वडिल मुंबईत खासगी कंपनीत कामाला होते, तर त्याचा भाऊ नुकतात नोकरीवर लागला होता. त्याच्या शेजाऱ्यांनी माहिती दिली की, आफताबच्या कुटुंबाने केवळ १५ दिवसांपूर्वी आपले घर रिकामे करून ते मीरा रोड परिसरात राहायला गेले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी आफताब या ठिकाणी दोन ते तीन तासांसाठी येऊन गेला होता. अशी माहिती गृहसंकुलाच्या सचिवाने दिली. यामुळे आफताबच्या कृत्याची माहिती त्याच्या कुटुंबाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत तपास केला जाणार असल्याचे माणिकपूर पोलिसांनी सांगितले.