आफताब पूनावालाचे कुटुंबीयसुद्धा मुलगी श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणामध्ये सहभागी होते असा आरोप श्रद्धाच्या वडीलांनी केला आहे. आफताबला सर्वांसमोर फाशी देण्यात यावी अशी मागणीही श्रद्धाच्या वडीलांनी केली आहे. श्रद्धाचा लिव्ह-इन-पार्टनर असलेल्या आफताबने १८ मे रोजी श्रद्धाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन तो पुढील तीन आठवडे त्यांची विल्हेवाट लावत होता. या प्रकरणात आफताबला १२ नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “मला बेडवरुनही…”; श्रद्धाचे WhatsApp, Insta चॅट दिल्ली पोलिसांच्या हाती! पाहा Screenshot

श्रद्धाच्या खून प्रकरणासंदर्भात ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी आफताबाला सर्वांसमोर फासावर लटकवण्यात यावं अशी मागणी केली आहे. तसेच दिल्ली पोलीस आफताबच्या कुटुंबियांची चौकशी करत नसल्याबद्दलही विकास यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “मला आता असं वाटतंय की संपूर्ण कुटुंबच या हत्येमध्ये सहभागी होतं. सध्या ते फरार आहेत. पोलिसांनी त्यांचीही चौकशी केली पाहिजे,” असं विकास वालकर यांनी म्हटलं आहे. “आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी साधं आमचं ऐकूनही घेतलं नाही. आफताबला श्रद्धासंदर्भातील प्रकरणामध्ये समज द्यावी यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो,” असं विकास वालकर यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: पूनावाला कुटुंबाला होती हत्येची कल्पना? १५ दिवसांपूर्वीच घर सोडताना आफताबचे वडील म्हणाले, “माझ्या मुलाला…”

श्रद्धाला झालेल्या मारहाणीसंदर्भातही श्रद्धाच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली. “आता शेजारी सांगत आहेत की तो तिला इतकी मारहाण कारायचा की त्यापासून वाचण्यासाठी ती इमारतीखाली पळून यायची,” असं विकास वालकर म्हणाले. “एकदा श्रद्धाने (वसईमध्ये वास्तव्यास असताना) मला मेसेज केला होता की येऊन मला घेऊन जा नाहीतर आफताब मला मारुन टाकेल,” असं श्रद्धाच्या वडिलांना ती संपर्काच्या बाहेर असल्याचं सर्वात आधी सांगणाऱ्या श्रद्धाच्या मित्राने म्हटलं होतं.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: खांद्याला, पाठीला दुखापत अन् आफताबची सोबत; नालासोपाऱ्यातील रुग्णालयात आलेली श्रद्धा

श्रद्धा आफताबच्या संपर्कात आल्यानंतर तिचं वागणं, बोलणं फार बदलल्याचंही विकास वालकर म्हणाले. “तिच्या वागण्यात बराच बदल झाला होता. मी तिला एकदा याबद्दल सविस्तर सांगितलं होतं तसेच एखाद्या समोपदेशकाची मदत घे असा सल्लाही दिला होता,” असं विकास वालकर म्हणाले.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताब झालेला जखमी? उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, “तो मे महिन्यात…”

श्रद्धाचा खून करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाच्या कुटुंबियांनाही त्यांच्या मुलाने केलेल्या कृत्याची कल्पना होती की काय यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केले जात आहे. हे प्रश्न उपस्थित करण्यामागील मुख्य कारण म्हणजे एकीकडे आफताबची या प्रकरणामध्ये चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे आफताबच्या कुटुंबियांनी राहत्या सोसायटीमधील घर सोडून दुसरीकडे स्थलांतर केलं. आफताबला शनिवारी अटक करण्यात आली. मात्र या अटकेच्या १५ दिवस आधी तो मुंबईमधील त्याच्या कुटुंबियांना भेटून गेला होता. आफताबने कुटुंबियांना दुसऱ्या घरामध्ये शिफ्टींगसाठी मदत केली होती अशी माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा > Shraddha Murder Case: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे… इतकं क्रूर कृत्य करणाऱ्या आफताबबद्दल मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात, “अनेकदा अशा…”

आफताब वसईच्या दिवाणमाण येथील युनिक पार्क या परिसरात २० वर्षांपासून आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचे वडिल मुंबईत खासगी कंपनीत कामाला होते, तर त्याचा भाऊ नुकताच नोकरीवर लागला होता. त्याच्या शेजाऱ्यांनी माहिती दिली की, आफताबच्या कुटुंबाने केवळ १५ दिवसांपूर्वी आपले घर रिकामे करून ते मीरा रोड परिसरात राहायला गेले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी आफताब या ठिकाणी दोन ते तीन तासांसाठी येऊन गेला होता. अशी माहिती गृहसंकुलाच्या सचिवाने दिली. यामुळे आफताबच्या कृत्याची माहिती त्याच्या कुटुंबाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha murder case aftab poonawala family too involved want him to be hanged publicly says walkar father scsg