वसई: संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील मयत श्रध्दाचे वडील विकास वालकर यांचे रविवारी सकाळी वसई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.वसईतील श्रध्दा वालकर (२८) ही तरुणी प्रियकर आफताब पूनावाला सोबत दिल्लीत रहात होती. मे २०२२ मध्ये आफताबने तिची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रिज मध्ये ठेवले होते.  मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुकडे गुडगाव येथील जंगलात फेकून दिले होते. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. वसईत राहणारे मयत श्रद्धाचे वडील विकास वालकर मागील ३ वर्षापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. रविवारी सकाळी वालकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी वसईच्या बंगली येथील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते वसईच्या संस्कृती अपार्टमेंटमध्ये रहात होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच एकच खळबळ उडाली. रविवारी संध्याकाळी वसईतील  स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलीच्या अस्थींचे अंत्यसंस्कार अपूर्ण राहिले

आफताबने जंगलात फेकलेल्या श्रध्दाच्या मृतदेहांच्या तुकड्यांपैकी १३ अवशेष दिल्ली पोलिसांना मिळाले होते. श्रध्दावर अंत्यसंस्कार करायचे असल्याने तिचे वडील विकास वालकर मृतदेहाच्या अवशेषांची मागणी करत सतत दिल्लीवारी करत होते. अशा हत्याकांडा विरोधात देशभरातून संताप व्यक्त होतो. पण हे प्रकरण जलतगती न्यायालयात असूनही अनेक तांत्रिक गोष्टीमुळे निकाल लवकर लागत नाही. या विलंबामुळे श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष देखील मिळू शकले नाही अशी खंत त्यांना होती.  निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात ज्या प्रकारे चौकांना फाशीची शिक्षा मिळवून दिली त्याप्रमाणे श्रद्धा वालकर प्रकरणात न्याय मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्न होते. मात्र त्यांना शेवटपर्यंत मृतदेहाचे अवशेष मिळालेेले नव्हते. मुलीच्या मृतदेहाचे अवशेष दिले नाहीत तर मी दिल्लीत आमरण उपोषण करण्याचा असा इशाराही विकास वालकर यांनी दिला होता.

श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना

श्रद्धा च्या हत्येनंतर या मुलींमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विकास वालकर यांनी श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट स्थापना केली होती. १८ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांनी वसईत या ट्रस्टचा शुभारंभ करण्यात आला होता. माजी खासदार किरीट सोमय्या तसेच श्रद्धा वालेकर प्रकरण न्यायालयात लढणाऱ्या वकील ॲड सीमा कुशवाह यावेळी उपस्थित होते. विकास वालकर हे श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत सामाजिक कार्यांबरोबर मुलींमध्ये जनजागृती करणे, त्यांचे समुपदेशन आणि कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी काम करत होते.